Breaking News

गोविंद सागर तलावाच्या भिंतीवर झाडाझुडपांचे साम्राज्यटाकळीभान/प्रतिनिधी 
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँकच्या (गोविंद सागर) भिंतीवर आतील व बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे वाढल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे. ही झाडे झुडपे काढावीत, त्याची साफसफाई करावी अशी मागणी अनेकदा करूनही पाटबंधारे विभागाने या मागणीकडे अद्याप पर्यंत लक्ष दिलेले नाही, असा आरोप करत यावर कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
 १९७२ च्या दुष्काळात या टेलटँकची निर्मिती झालेली असून स्व. गोविंदराव आदिक कृषी मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून टेलटँकची निर्मिती झाली होती. त्यामुळे या टेलटँकला गोविंद सागर या नावाने संबोधले जाते. १९७.१८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या टेलटँकचे १९४.१४ दशलक्ष पाणी वापरात येते. व उर्वरित पाणी मृतसाठा असतो. टेलटँकचे पाणी १६ नंबर चारीने दिले जाते. ते पाणी टाकळीभान, घोगरगाव व बेलपिंपळगावच्या काही भागात पोहचते. या वर्षी टेलटँक पूर्ण क्षमतेने भरला आहे. टेलटँकच्या पाण्याचा पाझर टाकळीभानसह परिसरातील गावांना होत असल्याने टेलटँक टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरला आहे. टेलटँकच्या परिसरात टाकळीभानसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना असून टाकळीभानच्या पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी या परिसरात असल्याने जोपर्यंत टेलटँकमध्ये पाणीसाठा असतो तोपर्यंत या विहिरींना मुबलक पाणी असते.त्यामुळे टाकळीभानला शक्यतो पाणी टंचाई जाणवत नाही.
 परंतु या टेलटँकच्या भिंतीवर झाडे झुडपे वाढलेले असल्याने या भिंतीस धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने टेलटँकच्या भिंतीवर आतील व बाहेरील बाजूस वाढलेली झाडे, झुडपे तातडीने काढावित अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.