Breaking News

गोदावरी लाभक्षेत्राला रब्बीत एक,उन्हाळ्यात तीन आवर्तने:आ.विखे


राहाता/प्रतिनिधी
 गोदावरी लाभक्षेत्राला रब्बी हंगामासाठी एक आणि उन्हाळ्यात तीन आवर्तन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापुढे कालवा सल्लागार समितीच्या बैठका जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांनी घेण्याबाबतच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
 गोदावरी लाभक्षेत्रातील पाटपाण्याच्या आवर्तनाचे नियोजन आणि लाभक्षेत्रातील समस्यांबाबत मंत्रालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस खा.सदाशिव लोखंडे, आ.लहू कानडे, आ. आशुतोष काळे, माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी उशीरापर्यंत झालेल्या पावसामुळे लाभक्षेत्रात पाण्याची मागणी झाली नाही. त्यामुळे रब्बी हंगामाचे आवर्तन उशीरा होत आहे. रब्बी हंगामासाठी फेब्रुवारी-मार्च मध्ये पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यासाठी तीन आवर्तनाचे नियोजन करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले की, आजपर्यंत कालवा सल्लागार समितीच्या बैठका या मंत्रालयीन स्तरावरच होत होत्या. यामध्ये आता बदल करुन जिल्हा स्तरावरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीच्या बैठका व्हाव्यात या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करुन तसेच शासन परिपत्रकातही बदल करुन अंतिम निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 गोदावरी लाभक्षेत्रातील चाऱ्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत आहे. याकडेही बैठकीत मंत्री महोदय व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनास देण्यात आले असून, पाणी पट्टीच्या रक्कमेतूनच याबाबतची अंमलबजावणी करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. या बैठकीस तालुक्यातून गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, ऍ़ड.रघुनाथ बोठे, शिवराम गाडेकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.