Breaking News

अकोले तालुक्यात एमआयडीसी आणणारच आमदार किरण लहामटे यांचा जनतेला शब्द


कोतूळ/ प्रतिनिधी ः 
आई घोरपडा मातेच्या आशीर्वादाने आणि माझ्या आदिवासी जनतेच्या दिलेल्या प्रेमानेच मी अकोले तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. आज अकोले तालुक्यातील प्रत्येक माणसाला मी आमदार समजतो. मी माझ्या जनतेशी गद्दारी करणार नाही. त्यांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. जनतेच्या विश्‍वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यात एमआयडीसी आणणारच, असाही शब्द दिला.
अकोले तालुक्यातील अकोले तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती संघर्ष समितीच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणणारे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बापू खाडे यांचाही समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मारुती मेंगाळ, तुकाराम गभाले, हरिभाऊ अस्वले, यमाजी लहामटे, आनंद खाडे, देवराम ईदे  महाराज, नाथू भांगरे महाराज, गणपत पटेकर, मारुती लांघी, मंगला पटेकर, धीरेन सगभोर, शरद कोंडार यावेळी उपस्थित होते.
आमदार लहामटे म्हणाले, आदिवासी समाजात घुसखोरी ही माजी आदिवासी मंत्र्यांच्याच कालावधीत झाली. आमच्या तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून पाण्यावर आगोदर आमचा हक्क आहे. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतात अगोदर पाणी खेळले पाहीजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहे, असेही आश्‍वासन लहामटे यांनी दिले.
अशोक भांगरे म्हणाले, या तालुक्यातील जनतेने ठरवलं तर काय होतं हे विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं आहे. आदिवासी बांधवांच्या प्रत्येक कार्यक्रमास मोठ्या जनसमुदायाने उपस्थिती लावावी. तरच चांगले विचार आदिवासी बांधवांपर्यंत  पोहचतील. त्यातून आमचा आदिवासी सदृढ होईल. आदिवासी समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या समाजात प्रगती होणार नाही. तुम्ही आम्हाला निवडून दिले. त्याचे उपकार आम्हाला फेडायचे आहेत, असेही ते म्हणाले.





हिंमत असेल तर पुन्हा निवडून या
 पंचायत समितीचा निकाल हा जनतेचा निकाल नाही. हिंमत असेल तर जनतेतून परत निवडून येऊन दाखवाच, असे आव्हान माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी माजी आमदार वैभव पिचड यांना दिले. पुढील निवडणूक ही अकोले तालुक्यातील साखर कारखान्याची आहे. तो कारखाना आम्हीच ताब्यात घेऊ व पहिली साखर बोनस म्हणून अकोले तालुक्यातील जनतेला देऊ, असेही आश्‍वासन मेंगाळ यांनी दिले.