Breaking News

'जेफ बेजोस चले जाओ!' 'अमेझॉन' 'फ्लिपकार्ट' चले जाओ! मोबाईल विक्रेत्यांचे वाडियापार्कमध्ये आंदोलन


अहमदनगर / प्रतिनिधी
एफडीआय पॉलिसी नुसार ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या विदेशी कंपन्यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन सेवेमुळे देशभरातील हजारो मोबाईल विक्रेत्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे देशभरातील असंख्य व्यापारी देशोधडीला लागले आहेत. विद्यमान मोदी सरकारला भारतीय व्यापाऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडूनसुद्धा सरकार व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कुठलीही पावले उचलताना दिसून येत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. मोदी सरकार ऑनलाईन व्यापारावर कारवाई करता देशभरातील व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर रोष ओढवून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस हे भारत भेटीवर आले असून भारतामध्ये सर्व व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण आहे. ऑनलाईनसाठी पायघड्या टाकायच्या आणि देशभरातील व्यापार अमेरिकेच्या हातात सोपवायच्या सरकारी धोरणाच्या विरोधात मोबाईल व्यापारी आता एकत्रित लढा उभारताना दिसून येत आहे. सदर मोहिमेचा एक भाग म्हणून अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशन यांच्यावतीने 'जेफ बेजोस चले जाओ', 'अमेझॉन, फ्लिपकार्ट चले जाओ'च्या घोषणा देऊन वाडिया पार्क येथील गांधी पुतळ्यासमोर मोठे आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात आंदोलकांनी सांगितले, की ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्या म्हणजे दुसरी इंग्रजी राजवट आहे. आपल्या भारताचा व्यापार परदेशी कंपन्यांच्या हातात घेऊन इथला स्थानिक व्यापारी संपवण्याचे षडयंत्र सरकार करत आहे. वास्तविक पाहता ऑनलाइन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये सर्व मोबाईलचे दर हे सारखेच असून तसेच ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. बहुतांशी नकली वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. ऑनलाईन खरेदीवर कुठल्याही प्रकारची सेवा ग्राहकांना देण्यात येत नाही, हे महत्वाचे. फसवणूक झाल्यास ग्राहकाला मनस्ताप तर होतोच आणि न्याय मागायला जागाही नसते. सुरुवातीपासूनच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट अमेरिकन कंपन्यांनी एफडीआय पॉलिसीचे वारंवार उल्लंघन केलेले आहे. या सर्व गोष्टी सरकारच्या वेळोवेळी निदर्शनास आणूनसुद्धा सरकार कुठलीही कारवाई करण्यास पुढे येत नाही. आजमितीस संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास ३० ते ४० हजार मोबाईल दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच जर परिस्थिती राहिली आणि सरकारने या अमेरिकी कंपन्यांवर काही कारवाई केली नाही तर पुढील काही वर्षांत ऑफलाईन मार्केट बंद पडण्याच्या स्थितीमध्ये येईल आणि त्या अनुषंगाने भारतीयांची रोजीरोटी जाऊन  मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल. याचे गांभीर्य सरकारला आहे का, असा सवाल मोबाईल रिटेलर्समधून उपस्थित केला जात आहे.
... तर विक्री पश्चात चांगली सेवा मिळेल 
शहरातील मोबाईल रिटेलर असोसिएशनच्यावतीने सर्व देशवासियांना करण्यात आले आहे, की इथून पुढे आपण कुठलीही गोष्ट खरेदी करताना एक वेळेस तरी आपल्या जवळच्या स्थानिक दुकानदारांकडे जाऊन चौकशी करावी आणि ऑनलाइन ऑफलाइनचे दर सारखेच असल्यामुळे  आपल्या स्थानिक दुकानदाराकडूनच खरेदी करावी. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि विक्री पश्चात सेवा सुद्धा चांगली मिळेल.