Breaking News

मुदतीत कामे न केल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई कालवा कृती समितीच्या आंदोलनानंतर जलसंपदाचे आश्वासन कोपरगाव / ता.प्रतिनिधी
  निळवंडे धरण प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण अग्रक्रमाने टाकावे अकोलेतील कालव्यांचे मंदावलेले काम शिघ्रगतीने सुरु करण्यासाठी मुदत संपलेली कामे काढून ठेकेदार बदलावा आदी मागण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जलसंपदाने ठेकेदार न्यू एशिअन कन्ट्रक्शन कंपनीस दिलेल्या मुदतीत इच्छित मशिनरी कामावर हजर करून जलसंपदाने दिलेला इष्टांक गाठल्यास दंडात्मक कारवाई करून त्यानंतर कामे काढून घेण्याचे आश्वासन दिले.
 उत्तर नगर जिल्हयातील अकोले,संगमनेर,राहाता,कोपरगाव,श्रीरामपूर,राहुरी,सिन्नर आदी सात तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प मंजूर होऊन ४८ वर्ष उलटत आली आहे. मात्र अद्याप या गावांना पिण्याचे शेती सिंचनाचे पाणी मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीने संगमनेर प्रांत कार्यालयासमोर नुकतेच लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. त्यावेळी कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्या वतीने उप-कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी हे लेखी आश्वासन दिले आहे.
 यावेळी संगमनेरचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे, उपकार्यकारी अभियंता गायकवाड, जलसंपदाचे उप कार्यकारी अभियंता प्रमोद माने आदींसह कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मछिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, सोन्याबापू उऱ्हे, सचिव कैलास गव्हाणे, संघटक नानासाहेब गाढवे, माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, रमेश दिघे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
  यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस.अहिरे यांनीं १८२ गावांचे पाणी आरक्षण टाकण्यास गत पावणेतीन वर्ष टाळाटाळ केल्याने वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्या कारभारावर शेरेबाजी केल्याचे लक्षात आणून देत कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फैलावर घेतले. आगामी काळात त्यांनी सकारात्मक कारवाई केल्यास त्यांच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.