Breaking News

शेवगाव तहसील कार्यालयावर मूकमोर्चाशेवगाव/प्रतिनिधी ः
राष्ट्रीय नागरिक नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या  निषेधार्थ सोमवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. मोर्चात मुस्लीम तसेच विविध संघटना सहभागी होत्या.
मोर्चा सकाळी सोनिया दर्ग्याच्या जवळील कब्रस्तानपासून ते तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. सरकारच्या विरोधात यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली. शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते गोपीनाथ मुंडे, तसेच संत गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चेकर्‍यांनी तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेला.
   मोर्चामध्ये इतर नागरिकांसह युवकांचाही मोठा सहभाग होता. मोर्चामध्ये विविध फलक घेऊन मोर्चेकर्‍यांनी सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयात गेल्यानंतर मोर्चात सहभागी काही लोकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मोर्चेकर्‍यांना सामोरे जाऊन नायब तहसीलदार माळी यांनी निवेदन स्वीकारले. पोलिसांच्या वतीने यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोर्चामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवनकुमार साळवे, किसन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश भोसले, माजी उपसभापती संजय फडके, पंचायत समिती सभापती क्षितीज घुले, ताहेर पटेल, रिजवान शेख, समीर शेख, आबेद हाफीज, मुश्ताक हाफीज, कॉम्रेड सुभाष लांडे, संजय नांगरे, मनसेचे गणेश रांधवणे, वहाब शेख, दत्ता फुंदे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, गणेश साळवे सहभागी झाले होते.