Breaking News

श्रीगोंदे तालुक्यात तलाठ्याचा ऑफिसलेस कारभारकोळगाव/प्रतिनिधी :
शासकीय कार्यालयात पेपरलेस कारभार हा शब्द आपण ऐकला असेल. परंतु ऑफिसलेस कारभार कोणीही पहिलेला नसेल. असा कारभार पहायचा असेल तर श्रीगोंद्याला भेट द्यावी लागेल.
असा कारभार श्रीगोंदे तालुक्यातील एका गावातील तलाठी कार्यालयाचे कामगार तलाठी करत आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील या कामगार तलाठ्यांचा हा कारभार राजरोसपणे सुरू आहे. हे तलाठी भाऊसाहेब हा कारभार तहसील कार्यालयापासून  हाकेच्या अंतरावरील एका हॉटेलमध्ये बसतात. ते तलाठी भाऊसाहेब कार्यालयाच्या सजाच्या ठिकाणी जात नाहीत. आपल्या हाताखाली असणारा कोतवाल याला गावातील कामांच्या सह्या घेण्यासाठी कागद बोलावून घेतात आणि तलाठी भाऊसाहेब चक्क हॉटेलमध्ये सह्या करत बसतात.
सर्वसामान्य नागरिकांना हे भाऊसाहेब सजाच्या ठिकाणी भेटत नसल्याने त्यांची कामे खोळंबतात. कामे खोळंबल्यामुळे भाऊसाहेबांची शोधाशोध सुरू होते.
 एकीकडे कर्तव्यदक्ष तहसीलदार स्वतः इतर कामांचा निपटारा करत सर्वांना शिस्त लावतात. परंतु तलाठी भाऊसाहेबानी मात्र ऑफिसऐवजी ऑफिसलेस कारभार करून आपल्या कर्तव्यदक्षतेचा असाही नमुना दाखवला आहे.
भाऊसाहेबांच्या या कारभाराची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे. आता मात्र ते भाऊसाहेब कोण, ते काम कोणते, आणि कोणाचे आहे याचीही उत्सुकता वाढली आहे. महसूल विभाग आता या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.