Breaking News

केडगावच्या नागरी समस्या मार्गी लावा अन्यथा मनपासमोर उपोषण


अहमदनगर / प्रतिनिधी
उपनारातील केडगाव भूषणनगर येथील मुलभूत नागरी समस्या सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त, महापौर तसेच खासदारांनादेखील देण्यात आले. ड्रेनेज, पाणी आणि रस्त्याचे प्रश् तातडीने मार्गी लावण्यात यावेत. अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भूषणनगर भागातील ड्रेनेज लाईन जीर्ण झाली असल्याने ती जागोजागी तुटली आहे. परिणामी ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. दुर्गंधी आणि घाणीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात लहान मुलांसह नागरिक साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. पिण्याची पाईपलाइनदेखील अत्यंत जुनी झाली असून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. या भागातील काही ठिकाणी नागरिकांना पाणीदेखील मिळत नाही. तसेच येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असून भूषणनगरमधील अंतर्गत रस्ते पुर्णत: खराब झाले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भूषणनगर येथे ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची तातडीने नवीन पाईपलाइन टाकून, अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल हांडोरे, देवडे सर, प्रवीण खाडे, राजेंद्र भोर, तुषार धस, अर्जुन ठाणगे, योगेश पाथरकर,सत्रे, चंगेडिया यांच्या स्वाक्षर्या आहेत.