Breaking News

'ट्रॅफिक'च्या 'ड्युटी तक्त्या'वर तब्बल ६४ कर्मचारी! 'फिक्स पॉईंट'वर अवघे आठ दहा! उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांना मोरेंनी केले 'कलेक्टर'!


अहमदनगर :  बाळासाहेब शेटे 
शहर वाहतूक शाखेच्या 'ड्युटी तक्त्या'वर एकूण ६४ कर्मचारी नेमणुकीला असल्याचे माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलेल्या पत्राच्या उत्तरात सांगण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखाहून अधिक असून या शहरातील प्रत्येक घरात चार पाच वाहने आहेत. एवढ्या सर्व वाहनचालकांचे अवजड वाहतुकीपासून संरक्षण करण्यासाठी ६४ कर्मचारी दाखविले जात असून त्यापैकी केवळ आठ ते दहाच कर्मचारी 'फिक्स पॉईंट'वर दिसतात. यावरून उर्वरित पन्नासहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना 'ट्रॅफिक'च्या मोरें साहेबांनी फक्त आणि फक्त वसुलीसाठीच 'कलेक्टर' केल्याचे निष्पन्न होत आहे. या बिचाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ 'बळीचा बकरा' करण्यात येत असून केवळ आठ ते दहाच कर्मचारी वाहतूक नियंत्रणाच्या इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या कामासाठी तैनात करण्यात येत असल्याबद्दल खरे तर या शाखेचा नागरी सत्कार करण्याचीच खरी गरज आहे. आजच्या चौथ्या भागात या ढिसाळ नियोजनाचेच 'सर्जिकल स्ट्राईक'...!
अहमदनगर शहरातून पाच महामार्ग जातात. यामध्ये नगर-कल्याण, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड, नगर-सोलापूर या महामार्गांचा समावेश होतो. याशिवाय या शहरात असे अनेक गर्दीचे आणि सतत रहदारीचे असे चार पाच महत्वाचे चौक आहेत. यामध्ये मार्केटयार्ड चौक, कोठी चौक, चांदणी चौक, जीपीओ चौक, दिल्लीगेट परिसर, पत्रकार चौक आदी चौकांचा समावेश असून या चौकांत सतत रहदारी असते. अनेक दुचाकीस्वार या चौकातून चुकीच्या दिशेने येतात. परिणामी अनेकवेळा अवजड वाहनाच्या चालकाला परिस्थितीचा अंदाज आल्याने अपघात होऊन यात कित्येकांचा जीव गेलेला आहे. शहरात ही अत्यंत गंभीर परिस्थिती असताना अवघे दहा ते बारा पोलीस कर्मचारीच शहराच्या वाहतुकीचा गाडा हाकत आहेत. बाकीचे पोलीस कर्मचारी रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक, अवजड वाहतूक आदी वाहनांचा पाठलाग करून पावती फाडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. शहर आणि परिसरात सातत्याने दिसत असलेले हे चित्र कधी बदलणार, वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार की नाही, या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालून केवळ वसुली करणारी ही शासकीय यंत्रणा नक्की कोणासाठी कार्यरत आहे, या यंत्रणेने आरटीओच्या कार्यकक्षेवर अतिक्रमण करून पावत्या फाडण्याचा 'उद्योग' आतापर्यंत जो महसूल जमा केलाय तो नक्की कोणाच्या घशात घातलाय, असा वसूल केलेला आतापर्यंतचा महसूल किती कोटी, आणि या शाखेचे हे काम आहे, की वाहतूक नियंत्रण करताना वाहन चालकांचे प्रबोधन करायचे, हे एकदा ठरविण्याची वेळ आल्याचे जनतेमधून बोलले जात आहे. यासाठी काही संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेला माहिती अधिकाराच्या कचाट्यात ओढण्याची तयारी करीत आहेत. या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती आल्यानंतर या शासकीय यंत्रणेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून शहर आणि ग्रामीण वाहतूक नियंत्रण शाखेची लक्तरे गावोगावच्या वेशीवर टांगण्याची अनेक संघटनांचे कार्यकर्ते तयारी करत आहेत. दरम्यान, साहेबांच्या आदेशावरून आपली हद्द नसतानाही वाहने अडवून पावत्या फाडणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सध्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी  अवजड वाहनांच्या चालकांकडून पैसे घेताना रंगेहात पकडल्यानंतर संबधितांची पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही या घटनेतून या शाखेचे मोरे साहेब आणि त्यांचे सहकारी काहीच धडा शिकले नाहीत, हे तमाम नगरकरांचे दुर्दैवच आहे.
पोलीस निरीक्षक मोरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणार
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी अलीकडच्या काही वर्षांत तोफखाना, जिल्हा विशेष शाखा, कोपरगाव आणि नगरच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोलीस निरीक्षकाच्या पदभार घेतला. सध्या या शाखेचे सर्वेसर्वा असलेल्या अविनाश मोरे यांनी पोलीस खात्यात रुजू होण्यापूर्वी शासनाला त्यांनी दिलेल्या स्वतःच्या मालमत्तेच्या विवरणाची सविस्तर माहिती आणि त्यांनी आतापर्यंत जी मालमत्ता कमविली आहे, त्या सर्व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी जिल्ह्याचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार आहोत. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्रांसह गृहमंत्री यांच्याकडे लवकरच पाठपुरावा करणार आहोत.
मतीन सय्यद, अध्यक्ष, भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेस.