Breaking News

'तगडा' 'फिक्स पॉईंट' हवाय? 'कंपनी ऑडली'ला द्या तीनशे रुपये! पीएसआयला दोनशे, साहेबांच्या 'चमच्यां'ना दोनशे ; वयोवृद्ध 'थ्री स्टार'वाले चौकात आणि तरुण पोलीस नाक्यांवर!


Balasaheb shete : ahmdnagar
Mo. 7028351747 {what’sapp} 
शहर वाहतूक नियंत्रण शाखेत दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांकडून हप्ता घेतला जात असल्याचेच आतापर्यंत अनेकांपर्यंत माहित होते. पण या पोलिसांची ड्युटी लावण्यासाठी काय आणि किती 'दिव्य' पार पाडावे लागते, हे जर ऐकले तर 'हप्तावसुली'चा खेळ जसा बाहेर चालतो, तसाच तो आतही चालतो, याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पोलीस कर्मचाऱ्याला तगड्या म्हणजे रग्गड पैसे कमवून देणारा 'फिक्स पॉईंट' मिळावा, अशी इच्छा आहे, यासाठी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची जो ड्युटी लावतो, त्या 'कंपनी ऑडली'ला प्रत्येक ड्युटीला तब्बल तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. यामुळे जे जुने अर्थात वयोवृद्ध 'थ्री स्टार'वाले पोलीस कर्मचारी आहेत, ते चौकात उभे राहून धूळ खात ड्युटी करतात आणि साहबांना जास्तीत जास्त 'मलिदा' देणारे तरुण पोलीस कर्मचारी रग्गड पैसे कमवीत आणि साहेबांना कमवून देत आहेत, ते नाक्यांवर मोठया रुबाबात नोकरी करताहेत, असे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून या शाखेत पहायला मिळत आहे. यात साहेबांचे सहकारी असलेल्या पीएसआयला दोनशे रुपये आणि साहेबांच्या 'चमच्यां'ना दोनशे रुपये, कारकूनला तीनशे रुपये द्यावे लागत असून रोज पडणारा हा 'खड्डा' भरून काढण्यासाठी बिचारा पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून पैसे कमवितो आणि वरिष्ठांनादेखील कमवून देतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे सध्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेले प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी या शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'फैलावर' घेतील का, हा खरा सवाल आहे.
'दैनिक लोकमंथन'ने सुरु केलेल्या शहर वाहतूक शाखेच्या या 'सर्जिकल स्ट्राईक'ची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून शहर वाहतूक शाखेच्या पो. नि. अविनाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलेच झापले. हा काय प्रकार आहे, हे काय छापून येतंय, याचा खुलासा काय आणि कसा करणार, वरिष्ठांच्या या प्रश्नांची उत्तरे देताना मोरे साहेबांची चांगलीच पंचाईत झाली. मात्र त्यांनी अजूनही केवळ 'वेट अँड वॉच' हीच भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी संगितले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेत ६० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालेले असताना चांदणी चौकासारख्या गर्दीच्या चौकात एकही 'फिक्स पॉईंट' का देण्यात आला नाही, त्याचप्रमाणे विशिष्ट चौकात नेमून दिलेल्या 'फिक्स पॉईंट'वरून या शाखेचे पोलीस कर्मचारी अचानक कुठे निघून जातात, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे क्रमप्राप्त आहे. आज, दि. १६ दुपारी : ३५ वाजता जीपीओ चौकात नेमून दिलेल्या 'फिक्स पॉईंट'वर असलेला पोलीस कर्मचारी बराच वेळ गायब होता. अशा गर्दीच्या चौकात ही बेजबाबदारी सामान्यांच्या आयुष्याशी खेळ ठरतो, याची संबधितांना कधी जाणीव होणार, हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही. दरम्यान, चांदणी चौकात तर आज दि. १६ नेहमीप्रमाणेच या शाखेचा एकही कर्मचारी नव्हता. परिणामी या चौकात दुपारी दीडच्या सुमारास बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. पोलीस नसल्याने या चौकात नागरिकांनाच वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागले. अशा वेळी अवजड वाहनांच्या गर्दीत अपघात झाला असता आणि कोणी मयत झाले असते तर जबाबदारी नक्की कोणावर, या प्रश्नाचे उत्तर मात्र या शाखेच्या पो. नि. मोरे यांच्याकडेही मिळणे अशक्य आहे. या एवढ्या मोठ्या आणि पाच पाच महामार्ग जात असलेल्या ऐतिहासिक शहरात अशी 'राम भरोसे' वाहतूक सेवा आणखी किती दिवस सुरु राहणार आणि या शाखेला आणखी किती जणांचे बळी जाऊ द्यायचे आहेत, हे एकदा या शाखेच्या पो. नि. मोरे यांनी ठरवून घेण्याची आवश्यकता आहे. 
आता जबाबदारी केवळ सुजाण नागरिकांचीच!
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या 'सर्जिकल स्ट्राईक'चे काल दि. १६ रोजी पाच भाग पूर्ण झाले. या सर्वच भागांत शहर नियंत्रण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय आणि 'अर्थपूर्ण' कारभाराची लक्तरे नगरच्या माळीवाडा आणि दिल्लीगेट वेशीवर टांगण्यात आली. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या वृत्तमालिकेचे कौतूक केले. काही संघटना तर यासाठी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरण्याच्या तयारी आहेत. काहींनी माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर करत या शाखेच्या 'अर्थपूर्ण' कारभाराची आणखी 'चिरफाड' करण्याची तयारी दर्शविली आहे. या वृत्तमालिकेद्वारे या शाखेच्या कारभाराची बरीच घुसळण झाली, हे वाचकांच्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. अजूनही आमचे अनेक 'सोर्सेस' माहिती देत आहेत. त्यामुळे या वृत्तमालिकेचे अनेक भाग असेच यापुढेही कित्येक दिवस सुरु राहतील. मात्र आता यापुढे खरे जबाबदारी या शहरातील सुजाण नागरिकांची राहणार आहे. कारण तुमच्या जीवाचे या शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही, त्यांना फक्त आणि फक्त पैसाच हवाय. म्हणूनच आपल्या सहकाऱ्यांकडून 'फिक्स पॉईंट'चेही ही माणसं पैसे घेत असतील तर त्यांना अपघातात कोणाचा जीव गेला आणि कोण दिव्यांग झाले, याचे काय सोयरसूतक असणार? तेव्हा आपला जीव अनमोल असून तो सुरक्षित ठेवत प्रवास करण्याची केवळ सुजाण नागरिकांचीच जबाबदारी आहे, इतकंच.