Breaking News

राहुरीत चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्रीत आठ ठिकाणी चोरी देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
 वळण येथे बुधवारी मध्यरात्री चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. गावातील बंद घरे, दुकाने व कार्यालये, अशा तब्बल आठ ठिकाणी चोरी केली. त्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरीचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
 चोरांच्या टोळीने बुधवारी रात्री वळण येथील शैलेंद्र बनकर यांचे किराणा दुकान फोडले. मात्र, गल्ल्यातील किरकोळ चिल्लर वगळता त्यांच्या हाती येथे फारसे काही लागले नाही. नंतर दीपक उदावंत यांच्या सोन्याच्या दुकानाच्या शटरची कुलपे तोडून चोरांनी आत प्रवेश केला. मात्र, तेथेही चोरांची निराशा झाली. बीएसएनएल मोबाईल मनोऱ्याचे कार्यालय व अभिनव पतसंस्थेच्या कार्यालयाची कुलपे तोडून चोरांनी प्रवेश केला. तेथेही त्यांच्या काही हाती लागले नाही. त्यामुळे चोरांनी कुलूपबंद घरांकडे मोर्चा वळविला.
कै.सतीश शेळके यांच्या घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरांनी आतील सामानाची उचकापाचक केली. तेथून सोन्याचे काही दागिने पळविले. नंतर सुभाष सोनार यांच्या घरामागील खिडकी तोडून चोरांनी आतील सामानाची उचकापाचक केली. बाबासाहेब काळे व उत्तम मकासरे यांच्या घरांतही चोरांनी सामानाची उचकापाचक केली. तेथे किती मुद्देमाल चोरीस गेला, याची माहिती मात्र समजली नाही.
  

 सीसीटीव्हीत तिघे कैद
 पोलिस उपनिरीक्षक यशवंत राक्षे, कॉन्स्टेबल आयूब पठाण यांनी घटनास्थळांची पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलाविण्यात आले. पोलिसांच्या श्वानाने राहुरीच्या दिशेने अर्धा किलोमीटरपर्यंत माग काढला. गावातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, तोंडाला फडके बांधलेले तिघे दिसल्याचे उपनिरीक्षक राक्षे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची पोलिस गस्त सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

     वाळूचोराचे पोलिसांना मार्गदर्शन ?
घटनास्थळांची पाहणी करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या वाहनात वळण येथील कुप्रसिद्ध वाळूचोर बसला होता. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तोच पोलिस पथकाला चोरीच्या तपासाबाबत मार्गदर्शन करत होता. अवैध धंदे करणाऱ्यांना बरोबर घेऊन पोलिस पथक फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.