Breaking News

... तर पत्रकार कल्याण निधीसाठी एक लाख देऊ : पाटील


देवळालीप्रवरा \ प्रतिनिधी
पत्रकार हा समाज व्यवस्थेचा कणा आहे. समाजाचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकार अहोरात्र झटतात. परंतु स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते. पत्रकारांनी आरोग्य संरक्षणासाठी निधी उभारावा. त्यासाठी, पत्रकार कल्याणकारी संघ स्थापना करून, ट्रस्टची नोंदणी करावी. पत्रकार कल्याण निधीसाठी एक लाख रुपयांची देणगी देऊ, अशी स्पष्ट ग्वाही जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती ॲड. सुभाष पाटील यांनी दिली.
वांबोरी येथे पत्रकारांच्या सत्कारप्रसंगी ॲड. पाटील बोलत होते. वांबोरीच्या सरपंच रोहिणी कुसमुडे, उपसरपंच राजेंद्र पटारे, सुखदेव कुसमुडे, परेश व्यास, प्रा. शाम पटारे, शरद पेरणे, राजेंद्र साळुंखे, दत्तात्रय मोरे, भाऊसाहेब ढोकणे आदी यावेळी उपस्थित होते. ॲड. पाटील म्हणाले, पत्रकारिता हे सेवाव्रत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बातम्या वर जाहिराती गोळा करतांना जिवाचे रान करणाऱ्या पत्रकारांचे स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. नुकतेच हृदयविकाराने पत्रकार मुख्तार सय्यद यांचे निधन झाले. दुर्धर आजार व अपघातामुळे यापूर्वी तालुक्यातील काही पत्रकार काळाच्या पडद्याआड गेले. पत्रकारांची कुटुंब वाऱ्यावर सुटली. समाजाचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पत्रकारांचे आजारपणात औषधोपचार, अपघात, नैसर्गिक मृत्यू प्रसंगी आर्थिक मदत उभी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी, पुढाकार घेऊन माझा खारीचा वाटा देण्याची माझी तयारी आहे. पत्रकार विलास कुलकर्णी, वसंत झावरे, सुनील भुजाडी, कर्णा जाधव, प्रभाकर मकासरे, गणेश हापसे, ॲड. विजय जोशी यांची यावेळी भाषणे झाली.