Breaking News

आदिवासी, भिल्ल समाजाच्यावतीने रास्तारोकोचा इशारा टाकळीभान/प्रतिनिधी
 श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील आदिवासी, भिल्ल समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (२७ जानेवारी) श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर 'रास्ता-रोको' आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
 तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, खिर्डी, भोकर, घुमनदेव, कारेगाव येथील आदिवासी, भिल्ल समाजाच्या उदर निर्वाहाचा स्त्रोत असलेल्या टाकळीभान टेलटँकवर मासेमारी करण्यासाठी गैर आदिवासींना दिलेले टेंडर रद्द करावे, टाकळीभान टेलटँकमध्ये जमिनी गेलेल्या आदिवासींचे पुनर्वसन करावे, टाकळीभान येथील शासकिय फाॅरेस्ट जमिनीमधील जमीन आदिवासींना उदरनिर्वाहासाठी मालकी हक्कात देण्यात यावी, महाराष्ट्रातील व अहमदनगर जिल्ह्यातील सेवानिवृत होमगार्ड यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांना किमान मानधन पाच हजार रूपये देण्याचे आदेश पारीत करावे, आज रोजी ताब्यात असलेल्या जमिनीवरील पिकांची पाहणी करून नोंद सातबारा व आठ सदरी घेण्यात यावी, आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
 निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, अध्यक्ष अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार,  पशु दुग्ध  मत्स्य विकास मंत्री, आदिवासी विकास मंत्री, प्रांताधिकारी श्रीरामपूर, श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर राज्याध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, मल्हारी पवार, होमगार्ड संयोजक समिती सचिव हरिश्चंद्र पवार, बाळू गांगुर्डे, दिलीप गोलवड, आण्णा गांगुर्डे, बाळासाहेब रणनवरे, नाना माळी, अशोक गायकवाड, रविंद्र वाघ, विजय निकम, अर्जुन पवार आदींची नावे आहेत.