Breaking News

देशाला वेठीस धरले जात आहे_


देशाला वेठीस धरले जात आहे अशी सडकून टीका साहित्य संमेलनात सारस्वतांनी आणि अनेक साहित्यकांनी केली. अशी घटना देशात कधीच घडली नव्हती. उलट साहित्यक हे सरकारच्या बाजूनेच उभे असायचे. आज पहिल्यांदाच साहित्य संमेलनात देशाच्या ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती विरोधात साहित्यकांनी गर्जना केली. समाजातील वाढता धार्मिक द्वेष, विरोधकांना खोट्या आरोपाखाली चिरडणे, गो हत्येच्या नावाखाली सामुहिक बळी, वाढता सामुहिक बलात्कार, गछण विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष हल्ला. पोलीस यंत्रणेचा पुरेपूर दुरुपयोग करून हल्लेखोरांना पकडायचे सोडून पोलीस निरपराध लोकांनाच तुरुंगात डांबत आहेत. यावरून सत्ताधार्यांना पोलिसांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करायचा आहे हे उघडपणे दिसत आहे. ह्या खोट्याचा भयानक प्रचार करून जनतेची दिशाभूल  करण्याची एकही संधी सत्ताधारी सोडत नाहीत. ‘मुह में राम बगल मे छुरी’ ही रणनिती वापरली जात आहे.  नेते गांधीचे नाव घेतात आणि आमदार, खासदार व कार्यकर्ते गोडसेचे. ‘तू मार मी अश्रू पुसतो’ ही प्रचलित नीती आजच्या सरकारची आहे. नेते सामुहिक बळीचा निषेध करतात तर कार्यकर्ते जोरदारपणे हे कार्य चालवतात.
ह्या सर्वांच्या पाठी हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकारण कायम  ठेवणे ही राजकीय निती स्पष्ट आहे. मागच्या निवडणुकीआधी वातावरण पूर्णपणे सरकारच्या विरोधात होते. राजकारणातील एक तत्व आहे कि आपल्या विरोधात लोक गेले कि युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची व लोकांचे लक्ष शत्रूवर केंद्रित करायचे. आता  तेच झाले. पुलवामात 40 पोलिस मारले गेले ह्याची जवाबदारी कुणाची?. पाकला दोष देवून तुम्ही मोकळे झालात. पोलीस दलातील जवान मारले गेले कारण काश्मिरमधील सर्वात महत्वाच्या महामार्गावरील सैन्याला काढून टाकले आणि उठझऋ  च्या ताब्यात दिले. हे केंद्र सरकारने केले. तुम्ही पाक पाक म्हणून मेलेल्या  घोड्याला धोपटत राहिला व स्वत:ची जबाबदारी झटकून टाकली. पाक द्वेष निर्माण करून देशाचे वातावरण बदलण्यात तुम्ही यशस्वी झालात. कुठेतरी बालाकोटवर हल्ला करून लोकांची सूडभावना शमवण्यात आली. त्या हल्ल्यात 1 मेला का 300 मेले याने पाकला काहीही फरक पडत नाही. पाकला मोठी शिक्षा केल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. तिकडे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानला मोठा फायदा झाला. भारताविरुद्ध वातावरण पेटवून त्याचे अपयश त्याला लपवता आले. नुसते नाटक करायचे. पाकवर हल्ला करायची हिंमत नाही, कारण तिकडे बाप-अमेरिका पाकच्या बाजूने सतत असतो. फक्त निवडणुकांच्या आधी लुटुपुटूची लढाई करायची आणि स्वत:ची पाठ थोपटत गमजा मारायच्या हाच सरकारांचा धंदा झालाय.
मी तर अनेक वर्ष मागणी करत आहे.  8000 सैनिक काश्मिरमध्ये आजपर्यंत  मारले गेले आहेत. कुठल्याच लढाईत एवढे सैनिक मारले गेले नाहीत. याचा एकदाचा निकाल लावा. हल्ला करून पाकचे 4 तुकडे करा. पण भाजपने कधीच हिंमत केली नाही. कारगिल युद्धात भाजपने सैन्याला सीमा पार करायला परवानगी दिली नाही. पाकने आपला प्रदेश कब्जा केला तरी भाजप सरकार अमेरिकेच्या दबावाखाली दाबली गेली. आता देखील 40 जवान मारले गेले पण मोदीने पाकवर हल्ला न करता झिरो बजेट फायदा करून घेतला. आपले 5 वर्षाचे पाप लपवण्यासाठी बालाकोटवर हल्ला केला आणि पाक पाक म्हणून लांडगा आल्याचा प्रकार घडविला.  निवडणूक संपली, पूलवामा विसरले. अशाप्रकारे कायम काही ना काही हिंदू-मुस्लिम द्वेष तेवत ठेवण्यासाठी घटना घडवल्या जातात.  गाय-बैलाचे राजकारण, रामजन्मभूमी, गंगेचे पाणी, कलम 370, नागरी कायदा असे अनेक प्रकार पाहायला मिळाले. कलम 370 इंदिरा गांधीने शेख अब्दुल्लाला 1974 मध्ये सोडून देतानाच काढला होता. सर्व तरतुदी नगण्य केल्या होत्या. फक्त जमीन घेण्याचा अधिकार देशबांधवाना नव्हता. मी अमितशहाना आव्हान  करतो  कि, तुम्ही 5 एकर जमीन काश्मिरमध्ये घ्या आणि कारखाना चालवून दाखवा. अरे भेंडीबाजारमध्ये कोणी दाऊदच्या परवानगी शिवाय जागा घेत नाही. अनेक राज्यात,  हिमाचल प्रदेश, आसाम, नागालँड, पालघर, नंदुरबार जिल्ह्यात आपण जमीन घेऊ शकत नाही.  हा विषय वेगळा आहे. उगाच 370 चे नाव काढून आपण खोट्याचे खरे करायचे आणि मुळ जनतेचे विषय गाडून टाकायचे. काय करताय महागाई रोखण्यासाठी? काय केले शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी? काय करताय कंत्राटी कामगारांना कायमची नोकरी देण्यासाठी? असे अनेक प्रश्‍न आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी पाकच्या मेलेल्या घोड्याचा उपयोग फार काळ तुम्ही करू शकणार नाहीत. निवडणूक आली कि काहीतरी घटना करून हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण करून निवडणूक जिंकण्याचे दिवस कायम राहत नाहीत. सत्याला तुम्हाला सामोरे जावेच लागेल. रोटी, कपडा, मकानचा हिशेब द्यावाच लागेल.
देविंदर सिंघ डझ पोलीस  यांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अटक झाली.  ह्यावरून अनेक वर्ष चाललेल्या  राजकारणाचे उघडे रूप समोर आले आहे. काश्मिरचा विषय धार्मिक करून तो चिघळत ठेवण्यात आला आहे. ह्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. अमेरिकेला स्वतंत्र काश्मिर पाहिजे, जेणेकरून त्याला अमेरिका ताब्यात ठेऊशकेल व भारत, चीन आणि रशियावर नजर ठेवू शकेल. भारतीय सैन्याने अनेक वेळा शांतता स्थापन केली होती, पण ती नेहमी बिघडवण्याचे काम घरभेद्यांनी केली.  देविंदर सिंघ काही मुस्लिम नव्हता पण तो देशद्रोही होता. असे अनेक पाकिस्तानी हेर पकडले गेले आहेत जे मुस्लिम नव्हते. कारण काश्मिरमध्ये दुसरेच चालू आहे आणि आपल्याला वेगळेच दिसते. भारतीय सैन्याची कामगिरी मात्र नेहमीच गुप्त ठेवण्यात आली आहे. वनी, औरंगझेब, इक्बाल हे दहशतवाद्यांशी लढताना मारले गेले. बर्याच मुस्लिम जवानांची आणि सामान्य मुस्लिम नागरिकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशासाठी त्यांचा त्याग कुणापेक्षा कमी नाही. काश्मिरमध्ये अनेक मुस्लिम लोक भारतीय सैन्याबरोबर काम करत आहेत. म्हणूनच सैन्याने कधी ह्याला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही.
1995 ला अनेक वर्ष काम करून आम्ही इखवान ह्या पहिल्या  दहशतवादी गटाला आत्मसमर्पण करायला लावले.  त्यात 2500 लोक पाकमधून परत भारतात आले. त्यानंर त्यांची कत्तल होत होती, म्हणून मी त्यांना सैन्यात घेण्याची विनंती तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना करून दहशतवाद्यांना आणि काश्मिरी तरुणांना सैन्यात घेतले. त्यांचे 8000 चे सैन्य बनवले. 2014 पर्यंत आम्ही दहशतवाद संपवला. भाजप आणि मेहबूबा सरकार आले आणि परत काश्मिर पेटला. आता नको ते करून 370 चे नाटक केले आणि काश्मिर दहशतवादाच्या आगीत लोटून टाकला. अनेक वर्ष दहशतवाद चालू आहे. पण कोणी आमदार खासदाराची हत्या कधीच झाली नाही. किती मोठे आश्‍चर्य. देविंदर सिंघ दहशतवाद्यांना संरक्षण तर देतच होता, पण तो दहशतवादी कार्याला मदत करतो. म्हणून पूलवामात 40 जवान मारले गेले, त्यास कोण जबाबदार आहे हे न बघता पाकला धोपटा. आधी आपले घर नीट करा. भारतीय सैन्यावर पूर्ण जबाबदारी द्या. सरकार ते देणार नाही. कारण सैन्यदलाचे तत्व आहे  ‘दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपवता येत नाही, हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो. सैन्याने यशस्वीपणे देशातील अनेक भागात दहशतवाद संपवला. सैन्य दहशतवाद संपवतो आणि राजकीय नेते दहशतवाद निर्माण करतात. भारत पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होतो. त्याला वाचवा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
मोबा 9987714929.