Breaking News

मी शेतकऱ्यांच्याच बाजूने उभा:आ. लहामटे अकोले/ता. प्रतिनिधी
 निळवंडे धरण कालव्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांच्या पाइपलाइनची मोडतोड सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मत व्यक्त करताना ' शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर संबंधित काम बंद पाडून मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील' असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे. 
 अकोले तालुक्यात निळवंडे धरणाच्या सुरू असलेल्या कालव्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले असून सदर पाइपलाइन संबंधित कंत्राटदाराने दुरुस्त करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी परिसरात निळवंडे धरणाचे कालव्यांची कामे सुरू झाले आहेत. या कामादरम्यान पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आपले म्हणणे आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कानावर घातले असून संबंधित कंत्राटदार व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना डॉ. लहामटे यांनी खडे बोल सुनावत समज दिली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर संबंधित काम बंद पाडून मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील असे  आ. लहामटे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. याबाबत मेहेंदुरी गावात लवकरच बैठक घेऊन सदर नुकसानीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे विकास बंगाळ, डॉ. अविनाश कानवडे यांनी सांगितले.