Breaking News

चायना मांजामुळे युवकाच्या गळ्याला दुखापत

अहमदनगर/प्रतिनिधी :  चायना मांजा पंतग उडविण्यास न वापरण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असतानाही मकर संक्रांतीनिमित्त उडविण्यात येणार्‍या पतंगासाठी चायना मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्याचा विपरित परिणाम म्हणजे शहरातील एका युवकाला या मांजामुळे हनुवटीखालील भागास गंभीर दुखापत झाली. यावर उपचार करताना डॉक्टरांना तब्बल 32 टाके घालावे लागले. उपचारासाठी तब्बल दीड ते दोन तास डॉक्टरांनी प्रयत्न करुन महत्प्रयासाने टाके घालून दुखापत झालेला भाग शिवला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अरबाज शेख हा 18 वर्षांचा युवक बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंग उडवणार्‍याचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला, त्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. पण हनुवटीखालील भागाला तो अडकून ओढला गेल्याने हा भाग कापला गेला. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला तेथे जवळच असलेल्या डॉ. बोरुडे यांच्या रुग्णालयात नेले. त्यांनीही तातडीने जखम साफ करून त्यावर टाके टाकले. पण हनुवटीला अडकल्यावर मांजा ओढला गेल्याने हनुवटीचा वरचा भागही कापला गेला आहे. हा सर्व भाग टाके घालून शिवण्यात डॉ. बोरुडे यांनी कौशल्य पणास लावले.