Breaking News

भारतात रस्ते अपघातात मरणार्‍यांची संख्या जास्त

अहमदनगर/प्रतिनिधी : “दरवर्षी शासनातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. मात्र वाहनचालक  वाहतूक नियमांची किती अंमलबजावणी करतात, त्याचबरोबर विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चारचाकी चालविताना सीट बेल्टचा वापर करणे, याचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या स्वतःच्या चुकीमुळे अपघात होऊ नये याची जर प्रत्येकाने काळजी घेतली तर रस्ते अपघाताची संख्या निश्‍चितच कमी होईल’’, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी केले.
31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास दीपप्रज्वल
न करून तारकपूर स्थानकावर सागर पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक मुरंबीकर, शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, वाहतूक शाखेचे अविनाश मोरे, एसटी महामंडळाचे विजय गिते, बांधकाम विभागाचे एस.आर.गुंजाळ, देसाई, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, “पालकांनीही जोपर्यंत आपला मुलगा 18 वर्षांचा होत नाही व त्याचे वाहन चालविण्याचा परवाना काढला जात नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नये. वाहन चालविताना दक्षता घेतल्यास अपघाताचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करताना कुठल्याही रोगापेक्षा भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त आहे.’’
प्रास्ताविकात दीपक पाटील म्हणाले, “90 टक्के अपघात सरळ रस्त्यावरच होतात. दरवर्षी रस्ते अपघातात भारतामध्ये दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. भारतात एका वर्षात साडेपाच लाख रस्ते अपघात होतात. एका महिन्यांमध्ये 873 लोकांनी आपला जीव गमावला. दर दोन दिवसांनी रस्ते अपघातामध्ये 5 जण मृत्युमुखी पडतात. यासाठी रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून त्यासाठी प्रयत्न व प्रबोधन करावे’’, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, अविनाश मोरे, दिलीप जाधव, विजय गिते, शिवाजी शिर्के आदींनी रस्ते सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बांधकाम विभाग, एसटी विभाग, आरटीओ विभाग, वाहतूक शाखेचे कर्मचारी व नागरिक यांच्यासह आरटाओ अधिकारी एस. एच. मुन्शी, श्रीराम पुंडे, माधवी वाघ, वरिष्ठ लिपिक रशीद शेख, परेश नावंदकर, नागपुरे आदी उपस्थित होते.