Breaking News

कृषीगंगा प्रदर्शनास लाखो नागरिकांची भेट


पारनेर/ प्रतिनिधी ः
नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारपर्यंत किमान एक लाख शेतकरी बांधव, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नेते मंडळींनी प्रदर्शनास भेट दिली आहे. या गर्दीमुळे पारनेर शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे.
 प्रदर्शनात युवा उद्योजक, बेरोजगार तरूणांनी स्वयंरोजगार निवडला आहे. त्यांच्या स्टॉलमधून  मालाची चांगली विक्री होत आहे.
  9 जानेवारी रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शनाची सुरुवात झाली. अण्णांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट देत आमदार नीलेश लंके यांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, सर्व सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, नेतेमंडळी, ग्रामस्थ व लाखो शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास भेट दिली.
 कृषीगंगा राज्यस्तरीय प्रदर्शनाचे व्यवस्थापक म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील युवक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी उत्कृष्ट असे व्यवस्थापन केले आहे. राज्यभरातून 150 व्यापारी बांधव आपल्या व्यवसायात वृद्धी करण्यासाठी पारनेर शहरांमध्ये आले आहेत.
त्यांची दुकानाची सुरक्षेची सर्व सुविधा देण्याची व्यवस्था चोख बजावली आहे. या व्यावसायिकांच्या स्टॉलमध्ये कृषिविषयक नवीन तंत्रज्ञान, कृषीची नवीन अवजारे, विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ई बाईक, बॅटरी पंप, पशुखाद्य, ठिबक सिंचन, सुधारित जैविक रासायनिक खते, औषधे, सेंद्रिय व रासायनिक खते, ऑटो स्टार्टर, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू, सोलर तंत्रज्ञान, दूध काढण्याची मशीन, कुक्कुटपालन, पतपुरवठा संस्था, महिला बचत गट, शासकीय योजनांची माहिती, खाऊ गल्ली, बालकांसाठी विविध प्रकारची खेळण्याची साधने, पाळणे येथे आले आहेत.
या राज्यस्तरीय प्रदर्शन सोहळ्याचा रविवारी समारोप होत आहे. या समारोप सोहळ्यास अहमदनगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकरी बांधव सर्व व्यापारी बंधूंनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब तरटे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, बापू शिर्के, सचिव पोटघन व आमदार नीलेश लंके यांनी केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, विदर्भ, मराठवाडा यासह  राज्यभरातून आलेल्या सर्व व्यावसायिकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला आहे. गेल्या तीन दिवसातच किमान 70 ते 80 लाखांची उलाढाल येथे झाली आहे. शेवटपर्यंत ही आर्थिक उलाढाल किमान दोन कोटीच्या आसपास पोहोचेल. माझ्या सर्व सहकारी मित्रांनी उत्कृष्ट असे योगदान या प्रदर्शनात दिले. प्रदर्शनाला भेट देणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करत प्रत्येक तासाला लकी ड्रॉद्वारे एक बक्षीस देण्याचा उपक्रम राबविला आहे. प्रत्येक शाळेने भेट दिली असता त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक शाळेला आयोजकांतर्फे डस्टबिन देण्यात आले आहे.
- आमदार नीलेश लंके