Breaking News

काँगे्रसकडून राज्यभरात आज तीव्र आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान मोदींची तुलना केल्याने संताप


मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याने, काँगे्रस आक्रमक झाले असून, शिवरायांचा वारंवार अवमान करणार्‍या भाजपविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणार्‍या ’आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.  शिवरायांच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडूनछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ’आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणार्‍या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच  व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी  देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे,  नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणार्‍या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही. ’शिवस्मारकातही घोटाळा करणार्‍या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे.