Breaking News

'साईज्योती'ला मिळालेला प्रतिसाद आत्मविश्वास देणारा : घुले यात्रा प्रदर्शनाचा समारोप ; सुमारे २ कोटींची उलाढाल


अहमदनगर / प्रतिनिधी
महिला बचतगट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देणारा नगरमधील साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा प्रदर्शन उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यंदाच्या अकराव्या वर्षी या जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रत्येक महिला बचत गटांच्या सरस उत्पादनांना मोठी मागणी राहिली. या प्रतिसादामुळे महिलांचा उत्साह निश्चितच दुणावला असेल. त्यामुळे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याची भावना मनात आहे. आजच्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगच्या युगात ग्रामीण भागातील महिलाही तितक्याच क्षमतेने आपली गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवू शकतात, ही बाब  साईज्योतीतून सिध्द झाली आहे. येथील अनुभव व पाठबळ महिलांना नवा आत्मविश्वास देणारा ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केला. दरम्यान, या स्वयंसहाय्यता यात्रेच्या माध्यमातून पाच दिवसांत तब्बल दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने सांगण्यात आले.
अहमदनगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेच्यावतीने गुलमोहोर रोडवरील तांबटकर मळा मैदानावर आयोजित साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा प्रदर्शनाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी अध्यक्षा घुले बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ऍड. शारदा लगड, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, अनिता हराळ,  जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी, महिला अधिकारी ,कर्मचारी व महिला बचतगटांच्या सदस्यांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला बचत गटांना प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी तागड, सहाय्यक अभियंता किरण साळवे, लेखाधिकारी आशिष कांबळे, कार्यालयीन अधीक्षक विजय चौसाळकर, सहाय्यक लेखाधिकारी स्मिता बिचके, प्रवीण वाळके, संतोष भराट,  आदिनाथ आव्हाड,  मंजुषा धीवर,  शीतल साठे, मनीषा शिंदे,
 भूषण मावळ, श्याम लोंढे, सचिन कर्डिले आदींसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अधिकारी, कर्मचार्‍यांचा अध्यक्षा घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. तर किरण साळवे यांनी आभार मानले.