Breaking News

संशयित चोरट्याला शेतकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात


पाथर्डी / ( प्रतिनिधी)
चोरीच्या विकलेल्या मोटरीच्या पैशाच्या वाटणीवरून चोरट्यांमध्ये झालेल्या वादातून भांडाफोड झाला. शेतकऱ्यांनी एका संशयित चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले असून या चोरट्यासह पाच जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील पूर्व भागातील परिसरात  गेल्या काही दिवसापासून  शेतकऱ्यांच्या  विहिरीवरील  विद्युत पंप चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. शेकटे, भुतेटाकळी, कोरडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पानबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेलेल्या आहेत. चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध घेत असतानाच इलेक्ट्रिक मोटार चोरीच्या टोळीमध्ये पैशाच्या वाटणीवरून वाद झाला. या घटनेची चर्चा परिसरात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विष्णू रंगनाथ घुले शेकटे यांनी संशयित पाच चोरट्यांच्या नावानिशी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये आपल्या ९ हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक पानबुडी मोटर चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर परिसरातील इतर शेतकऱ्यांच्याही  इलेक्ट्रिक मोटार चोरी गेल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.विष्णू घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी रामनाथ बाबुराव घुले, रामकिसन हरिभाऊ घुले, शरद कालिदास घुले, मारुती साहेबराव घुले (सर्व रा. शेकटे) व सयाजी महादेव केदार (रा. निपाणी जळगाव) यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सयाजी केदार याला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोमनाथ बांगर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी सयाजी महादेव केदार याला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.