Breaking News

शिर्डीत कडकडीत बंद, भाविकांची गैरसोय


शिर्डी : साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादातून शिर्डीमध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. रविवारी या बंदमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होतांना दिसून येत आहे.
शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली होती. मात्र बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेक भाविकांची मोठी गैरसोय झाली होती. शिर्डीत सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीची सुरवात ’शिर्डी माझे पंढरपूर’ आरती करून करण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ’ओम साई नमो नम:’ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिर्डीमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला होता. या बंदला आज चांगला प्रतिसाद मिळाला असून शिर्डीतील सर्व दुकाने, व्यवहार बंद आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर शिर्डीतील बंदवर तोडग्याबाबत हा वाद निवळण्याबाबत निर्णय होण्याची आशा आहे. दरम्यान, साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पण, वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.



मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज बैठक
साई बाबांच्या जन्मस्थळाचा वाद आणि शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी ही माहिती दिली. मुगलीकर म्हणाले, शिर्डीत कडकडीत बंद पुकारण्यात आला असला तरी मंदीर मात्र भाविकांसाठी खुले आहे. साई मंदिराला भेट देणार्‍या भाविकांसाठी या ठिकाणी राहण्याखाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.