Breaking News

मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने राज्यभरात संताप आजके शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी


मुंबई ः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे रविवारी भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवद्रितीय असे महामानव होते. मात्र या महामानवाची तुलना थेट पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्याचे दिसून आले.
या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, यावर भाष्य करतांना शिवेंद्रराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा नंतरच्या काळातील स्वातंत्र्य सेनानी यापैकी कोणाचीही तुलना कोणासोबत होऊ शकत नाही, असेदेखील शिवेंद्रराजे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांनी स्वत: ती निर्माण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी जगासमोर भारताची एक वेगळी प्रतिमा उभी करुन दाखवली आहे. त्यांनी देशवासियांचा विश्‍वास संपादीत केला आहे, अशी स्तुती यावेळी त्यांनी केली. पण पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकारी असतात. त्यांच्या माध्यमातून असे काही प्रकार होतात. आणि विरोधकांना पक्षनेतृत्त्वार टीका करण्यास, चिखलफेक करण्यास संधी मिळते. अशा पदाधिकार्‍यांना आवर घातला पाहिजे. त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. तसेच या पुस्तकाचे प्रकाशन थांबवावे आणि प्रकाशन झाले असेल तर वितरण थांबवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांना कधी 13 वा अवतार ठरवले गेले, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केली गेली, याकडे लक्ष वेधत ही केवळ चमचेगिरी असल्याचे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाने हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे.