Breaking News

कुष्ठधाम रस्त्याचे रुप पालटणार

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या नगर रचना विभागाने उपनगरातील टीव्ही सेंटर ते पाइपलाइन रस्त्यावरील भिस्तबाग चौकादरम्यानच्या कुष्ठधाम रस्त्यावरील तसेच त्यापुढील भिस्तबाग महालापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमित भागांवर लाल रंगाच्या खुणा केल्या आहेत. त्यानुसार ही अतिक्रमणे काही दिवसांतच संबंधितांनी काढून घेतली नाही तर या अतिक्रमणांवर महापालिकेद्वारे हातोडा टाकला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम मार्गी लागणार आहे.
टीव्ही सेंटर ते भिस्तबाग चौक या कुष्ठधाम रस्त्यासह पुढे भिस्तबाग महालापर्यंतच्या सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरणासाठी सुमारे साडेतीन कोटी खर्चाचे उद्दिष्ट्य आहे. सुमारे 20 मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन-दोन मीटर जागा सोडून सुमारे 16 मीटर रुंदीचा नवा रस्ता केला जाणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदाराला दिला आहे. पण महापालिकेने रस्त्याची मोजणीच करून दिली नसल्याने दोन महिन्यांपासून कामच सुरू झालेले नाही. नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे नगर रचना विभागाने संबंधित रस्त्यावरील अतिक्रमणांवर खुणा केल्याचे स्पष्ट करताना ती काढण्यासाठी त्याची यादी शहर अभियंता व सावेडी प्रभाग समितीला देणार असल्याचे स्पष्ट केले.