Breaking News

कोरठण खंडोबा यात्रोत्सवाला सुरुवात कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी रांगा


कान्हूर पठार/प्रतिनिधी ः
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येेथे शुक्रवारपासून श्री कोरठण खंडोबा यात्रोत्सवास प्रारंभ झाला. जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, तहसीलदार ज्योती देवरे, उत्तम पवार, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते खंडोबाला अभिषेक करण्यात आला. यानंतर महापूजा, महाआरती झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी आपल्या कुलदैवताचा तळीभांडार करून मोठ्या संख्येने भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. 
     प्रशासकीय अधिकारी मनोरमा आवारे, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, रामदास देवरे, सुनील आवारे, उपाध्यक्ष रामदास मुळे, विश्‍वस्त किसन धुमाळ, सरपंच अशोक घुले, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्‍वस्त किसन मुंढे, मनीषा जगदाळे, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ, बबन झावरे, गणपत वाफारे, बाळासाहेब मुळे, ज्ञानदेव घुले, प्रदीप भाटे, मंडलाधिकारी विशाल नवले, मोहन रोकडे, सुरेश सुपेकर यांनीही खंडोबाचे दर्शन घेतले.
 शुक्रवारी पहाटे चार वाजता स्वयंभू खंडोबा तांदळा मूर्ती व बारा लिंगे यांना विधीवत मंगलस्नान घालण्यात आले. चांदीच्या सिंहासनाचे अनावरण करण्यात आले. चांदीच्या उत्सव मूर्ती व फुलमाळांचा साजशृंगार चढविण्यात आल्यानंतर पहाटे मंगलआरती करण्यात आली. सकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते खंडोबाचा अभिषेक करण्यात आला. महापूजा, महाआरती झाल्यानंतर भाविकांना देवदर्शन खुले करण्यात आले.
 कडाक्याची थंडी असतानाही दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी चार वाजता खंडोबा उत्सव मूर्तीची शाही रथातून पिंपळगाव रोठा गावात मुक्कामी जाण्यासाठी मिरवणूक निघाली.
रात्री गावात पालखीची छबिना मिरवणूक निघाली. यात्रेत शासनाकडून आपत्ती निवारण व माहिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मार्फत तात्पुरती तात्काळ प्रतिसाद यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, देवस्थानचे उपाध्यक्ष गंगाराम बेलकर यांनी यात्रा नियोजनाची पाहणी केली. पोलिस उपाधीक्षक अजित पाटील, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोथरे, बालाजी पद्मने, नीलेशकुमार वाघ यांनी यात्रेत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
यात्रोत्सव रविवारपर्यंत चालणार आहे. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक तर तिसर्‍या दिवशी खंडोबा चांदीची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीमध्ये पालखीचे मानकरी सहभागी होतात. बेल्हा व अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील काठ्यांची मिरवणूक होते. या दोन्ही काठ्या पायरीजवळ आल्यावर शासकीय महापूजा होऊन एका काठी देवाला तर दुसरी कळसावर टेकवली जाते. त्यानंतर देवदर्शन घेतले जाते. नंतर इतर काठ्यांच्या मिरवणुका होऊन यात्रेची सांगता होते.

अग्निशमन, आरोग्य विभाग तैनात
जिल्हा पोलिस मित्र संस्था यात्रेत मदत करत आहेत. अळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी व जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक स्वयंसेवकाचे काम करीत आहेत. अग्निशमन यंत्रणा तसेच आरोग्य विभागाकडून लक्ष्मीकांत राऊत हे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथक तसेच रूग्णवाहिका यात्रेत तैनात करण्यात आली आहे.