Breaking News

सायबर गुन्ह्यांची वाढती दाहकता

 इंटरनेट-डिजिटल क्रांतीमुळे जग जवळ आले आहे. एका क्लिकवर संपूर्ण जगाची माहिती आपल्याला मिळते. यामुळे जरी ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असल्या तरी सोशल मीडियावर केलेली गडबड आपल्या अंगलट येऊ शकते. या गोष्टींबाबात आजही वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. पुण्यातील एका नामांकित बँकेतील सुमारे 90 कोटी रुपये सायबर क्राईमच्या रुपातून विविध देशांत काढले गेले. अशा प्रकारच्या घटना सतत कोठे ना कोठे घडत असतात. याचा आपल्याला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष झटकाही बसू शकतो. पुण्या-मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये खून, सोनसाखळी हिसकावणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांना अटकाव घालण्यात काही प्रमाणात पोलिसांना यश आले असले तरी नवीन वर्षात पोलिसांसमोर सायबर गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सायबर गुन्हेगारांनी जणू गुन्ह्यांची सलामीच पोंलिसांना दिली आहे. जी परिस्थिती पुण्यासारख्या झपाटयाने वाढणा-या शहराची आहे, तीच परिस्थिती आणि वाढते गुन्हेगारीकरण राज्यात सर्वत्र दिसते आहे. पारंपरिक गुन्हेगारीचा आलेख कमी होत असताना सायबर गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या काही वर्षभरापासून समाजमाध्यमावरून झालेल्या ओळखीतून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, गुंतवणुकीचे आमिष, लॉटरी लागल्याचे आमिष, संकेतस्थळावरून मोबाईल संच, फर्निचर, दुचाकी, मोटारी अशा वस्तूंची विक्री करायची आहे, असे आमिष दाखवून सामान्यांना हातोहात गंडा घातला जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
 2018 मध्ये पुणे शहरात सायबर गुन्हे शाखेकडे साडेपाच हजार तक्रार अर्ज दाखल झाले होते. 2019 मध्ये 8 हजार 677 तक्रार अर्ज दाखल झाले होते, तर 2020 च्या पहिल्याच आठवडयात सुमारे 241 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. दर दिवशी सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक फसवणूक करताना ‘हनी ट्रॅप’चा सर्रास वापर होत आहे. याबाबत सायबर विभागाकडून वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत असले तरी सर्वसामान्य नागरिक खासकरून महिला याकडे कानाडोळा करताना दिसतात. कोणतीही बँक आपला पासवर्ड, खाते नंबर वा इतर गोपनीय माहिती विचारत नाही, असे वारंवार खुद्द बँकांकडून सांगण्यात येत असते, तसे मेसेजही बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असतात. तरीही हमखास कोणाचा तरी फसवा फोन येतो आणि ग्राहक फसला जातो. पोलीस, बँका तसेच अन्य संस्थांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. आली. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येणा-या आमिषांना बळी पडू नका. ऑनलाईन व्यवहार करताना खातरजमा करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सायबर गुन्हे शाखेच्या सर्वेक्षणानुसार, 14 ते 16 वर्षे वयोगटातील 15 टक्केी पालक सुरक्षित इंटरनेटबाबत आपल्या मुलांसोबत संवाद साधतात. तर, 16  ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे 14 टक्केे पालक मुलांशी संवाद साधत नसल्याचे आढळून आले आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तष रश्मीे शुक्लाव, सह आयुक्त  रवींद्र कदम यांच्यासह आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राधिका फडके आणि त्यांची संपूर्ण टीम, तसेच करिअर कॉर्नर’चे ऋषीकेश हुंबे आणि गुगल इंडिया’चे अधिकारी वुई फाइट सायबर क्राइम’ या अभियानाद्वारे शाळा- महाविद्यालयांत जाऊन हे गुन्हे रोखण्याबाबत जागृती करीत आहेत. शिक्षक- प्राध्यापकही त्यासाठी पुढाकार घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
सायबर क्राईमच्या आकडेवारीनुसार देशभरात घडणा-या सायबर क्राईमपैकी 70 टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातूनच केले जातात. मोबाईलचे सीम सहजपणे बदलता येतात वा वापरून फेकून देता येतात, त्यांचा माग शोधण्यासाठी अथक प्रयत्न घ्यावे लागतात. तपास अधिकारी चिवट असेल तर तो कोणत्याही गुन्हेगाराला कोठूनही शोधून काढतोच! मात्र थोडासा हलगर्जीपणा झाला तर मात्र गुन्हेगाराच्या पथ्यावर पडते. मोबाईलच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक, हॅकिंग, फेक कॉल्स, बदनामी, व्हॉटस्अ‍ॅनप, फेसबुकच्या माध्यमातून अश्‍लील मेसेज, फोटो, व्हीडिओ शेअर करणे, फोटोशॉपच्या ट्रिक्स वापरून एखाद्याचे फेक अकाऊंट तयार करणे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे. खासगी संदेश सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करणे, पैशाची, शरीरसुखाची मागणी करणे असे गुन्हे घडतात. आपला आपल्या कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद असणे याकरिताच महत्त्वाचे असते. एखादी गोष्ट, आपल्याकडून कळत-नकळत झालेली चूक आपण थेट पालकांशी बोलू शकत नाही, पण मित्र-मैत्रीण, भाऊ- बहिणीसोबत शेअर करू  शकतो. या संवादामुळे कदाचित पुढचे अनर्थ टाळता येतात. देशभरात घडणा-या गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपासयंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. यातच आता सायबर क्राईमची मोठया संख्येने भर पडली आहे. केंद्र सरकार, सुरक्षा यंत्रणा, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅरप, ट्विटर, इन्स्टाग्राम याशिवाय अन्य सोशल मीडिया सेवा पुरवणा-या कंपन्यांनीही आता फेक न्यूज, अफवा यांबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. सायबर क्राईमची व्यापकता पाहता हा विषय फक्त एखादा संदेश, कमेंटस पास करणे, मालवेअर पास करणे, माहिती चोरणे असा मर्यादित नाही, तर अनेकदा आपल्याला आलेला एखादा व्हीडिओ, मेसेज आपल्यालाही अडचणीत आणू शकतो. नेट बँकिंग करताना कॉमन वाय फायचा वापर टाळावा, असे वारंवार सांगितले जाते, याशिवाय मोबाईल बँकिंग करताना वन टाईम ओटीपीचा आग्रह धरला पाहिजे. एकंदरीतच या सर्व गोष्टींची जबाबदारी पोलिसांवर न ढकलता थोडासा अलर्टनेस प्रत्येकानेच बाळगण्याची आवश्यकता आहे. सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे असतील, तर ग्राहकांनी सुरक्षा आणि  दक्षतेच्या बाबतीत चार पावले पुढे जात आपले पैसे आणि व्यक्तिगत खासगीपण जपण्याची जबाबदारी पेलायलाच हवी.