Breaking News

अहमदनगरची जैन चित्रपरंपरा जगासमोर यावी : बहुलकर


अहमदनगर / प्रतिनिधी
पूज्य तिलोकऋषीजी महाराज यांनी जैन धर्मातील चोवीस तीर्थंकारांचे जीवन कार्य चित्रातून रेखाटले आहे. त्यांची चित्रशैली त्यातून ते देत असलेला संदेश खूपच प्रभावित करणारा आहे. ही कलापरंपरा सर्वांसमोर आल्यास यातून अनेकांना चांगली प्रेरणा मिळेल. सुंदर चित्रे पाहिल्याचा आनंद मिळेल. शहरामधील धार्मिक परीक्षा बोर्ड येथील श्री तिलोकरत्न जैन पुस्तकालयात जैन चित्रकलेचा अनमोल असा ठेवा आहे. तो जतन करतानाच जगासमोरही यायला हवा, अशा भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार लेखक सुहास बहुलकर यांनी व्यक्त केल्या.
बहुलकर यांनी गुरुवारी आपल्या नगर भेटीत धार्मिक परीक्षा बोर्ड, आनंदधामला भेट देवून जैन साहित्य परंपरा, कला परंपरेची माहिती घेतली. धार्मिक परीक्षा बोर्ड येथील रत्नजैन पुस्तकालयाला त्यांनी भेट दिली. पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांची भेट घेवून त्यांनी जैन कलापरंपरा, चित्रशैलीबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांचे गुरु पूज्य तिलोकऋषीजी महाराज यांनी काढलेली चित्रे पाहिली. जैन धर्मातील सर्व २४ तीर्थकांरांचे जीवनकार्य तिलोकऋषीजी महाराज यांनी चित्ररुपाने रेखाटलेले आहे. ही चित्रशैली पाहून बहुलकर यांनी आनंद व्यक्त केला. येथील संग्रहात असलेली अनेक दुर्मिळ चित्रे, दुर्मिळ पुस्तके प्रभावित करणारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. छोट्या कागदावरील चित्रातून तब्बल ९६ हत्ती रेखाटलेले पहायला मिळाले. अशी अनेक आश्चर्यचकित करणारी चित्रे याठिकाणी आहेत. बहुलकर यांनी अतिशय आस्थेने या कलाकृतींची माहिती घेवून या कलाकृती जगासमोर येण्यासाठी त्यांचे आधुनिक पध्दतीने संवर्धन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आधुनिक काळात चित्रांचे जतन, प्रदर्शन कसे करावे याबाबतही त्यांनी माहिती दिली. या भेटीवेळी त्यांच्यासमवेत नगरमधील प्रसिध्द चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यासह गणेश कांकरिया, प्रमोद गांधी, रत्नजैन पुस्तकालयाचे केअर टेकर योगेंद्र त्रिपाठी, गणेश धाडीवाल होते. गणेश कांकरिया यांनी त्यांना आनंदधाम, धार्मिक परिक्षा बोर्ड याठिकाणी सुरु असलेल्या धार्मिक कार्याची माहिती दिली. बहुलकर यांनी आचार्यश्रींचे वास्तव्य असलेल्या जागा, त्यांनी वापरलेल्या वस्तूंची पाहणी करून समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
आचार्यश्रींचे गुरु पूज्य तिलोकऋषीजी महाराज यांनी धार्मिक परिक्षा बोर्डाची स्थापना केलेली आहे. ते दोन्ही हातांनी लिखान करायचे चित्र काढायचे. त्यांनी काढलेली दुर्मिळ चित्रे येथे आहेत. २५ ते ३० हजार पुस्तकांची संपदा याठिकाणी आहे. तसेच सर्वधर्मीय पवित्र ग्रंथही येथे उपलब्ध आहेत. इथून 'आनंददीप' या नावाचे मासिक निघते. याठिकाणी तीन हजार वर्षांपूर्वीचे जैन ग्रंथ आहेत. जैन साहित्याचे भांडार याठिकाणी आहे. जैनिझम परीक्षेचे साहित्य येथे आहे. अनेक साधूसाध्वीजी येथून अभ्यास करतात. धार्मिक परिक्षा बोर्डातील या साहित्य संपदेची पूज्य आदर्शऋषीजी महाराज संगोपन करीत आहेत. ग्रंथालयासाठीचे तीनशे रुपयातील आजीवन सभासदत्त्व सर्वधर्मियांसाठी खुले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.