Breaking News

पानिपत एक शूरवीरांची गाथा

कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती ! कवी गोविंद्रग्रजांनी आपल्या काव्यातून पानिपत युद्धाचं वर्णन अगदी सार्थ पणेकेले आहे.  पानिपत हा ऐतिहासिक रणसंग्राम हिंदुस्थानच्या बदलत्या राजकीय व्यवस्थेचा एक महत्वाचा टप्पा होता. मराठ्यांचे पानिपत झाले, हि म्हण या युद्ध पासून पडली मराठा साम्राज्य विस्तार व अखंड हिंदुस्थानवर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका पडकवताना पानिपतच्या रणसंग्रामात धाराती पडलेल्या मराठा सैनिकांचा तो रक्तशृगांर होता. भर मकर संक्रातीच्या दिवशी तळहातावर शीर घेऊन हिंदुस्थान रक्षणासाठी मातीत मिसळून गेलेल्या शूरवीरांची पराक्रमाची गाथा आहे.  
महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रावर चालून आलेला औरंगजेब महाराष्ट्राच्या याच मातीतच गाडला गेला. त्यामुळे दिल्ली दरबारात औरंगजेबा नंतर त्याच्या मुलांत सत्ता संघर्ष शिगेला पोचला होता.  याच काळात  श्रीमंत थोरल्या बाजीरावांनी पेशवायची सुत्रे हाती घेऊन 20 वर्षांत अटक ते कटक असे मराठा साम्राज्य विस्तारले होते. हे करता असतांना दिल्लीतील सत्ता नाममात्र झाली. अटकेपार झेंडा मराठा साम्राज्याचा फडकला होता. 1758 साली दिल्ली काबीजकरून पंजाब प्रांतावर चढाई करून तिमूरशहा दूराणी यास पिटाळून लावले. तिमुरशाह हा अहमदशाह अब्दालीचा मोठा पुत्र होता. थेट अब्दालीच्या साम्राज्याला आवाहन दिले होते. वास्तविक अहमदशा चवताळला होता. 14 जानेवारी 1761 रोजी अफगाणचाबादशाह अहमदशाह अब्दाली आणि दिल्लीची पातशाही पुन्हा मिळवण्यासाठी नजीब-उद-दौला यांच्याशी सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांबरोबर झालेले पानिपतचे तिसरे युद्ध होय.देशावरील परकीय सत्तेचे परिचक्र परतून लावण्याच्या प्रयत्नातमहाराष्ट्रातील आख्खी एक पिढी गारद झाली. प्रत्येक घरात कुंकवाचा करंडा लवंडला होता. 
पानिपत हे शहर हरियाणा राज्यात वसलेले आहे. दिल्ली ते चंदीगड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वरील शहर असून ते दिल्ली पासून 90 किमी अंतरावर आहे. पुराणात महाभारत काळात वाट्याला आलेल्या भागात पांडवांनी पाच शहरे स्थापितकेली. त्यापैकी पांडुप्रस्थ म्हणजे आजचे पानिपत होय. याच शहरात एकूण तीन युद्धे झाले. पहिले युद्ध 1526 साली दिल्ली सुलतान इब्राहीम लोधी आणि बाबर यांच्यात झाले. बाबरच्या शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षामोठ्या फौजेचा पाणि पाजले. या युद्धाने हिंदुस्थानवर मुघल साम्राज्याचा पाय रोवला गेला तर दुसरं युद्ध 1556 मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले यात मुघल विजय झाले आणि सत्ता केंद्र बनले. 15 जानेवारी 1761 तिसरं रणसंग्राम मराठे विरुद्धअब्दाली यांच्यात झाले यात मराठा साम्राज्याची फार मोठी हानी झाली ती भरून परत आलीच नाही.
तिमूरशहा दूराणी यास पिटाळून लावल्याने अब्दाली पुरता चवताळला होता. त्याने मराठ्यांची जिरवण्यासाठी त्याने 1759 मध्ये  पश्तून आणि बलूच व अफगाण जमातींमधून सैन्याची फळी उभी केली. आणि पंजाब प्रांतात असलेल्या लहानलहान  मराठा चौक्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील ज्यांना मराठा साम्राज्याचा कलह वाटत  होते  असे व  रोहिल्ला अफगाणांसोबत संधान साधून  मराठ्यांविरुद्ध  एक व्यापक फळी निर्माण केली. दिवसागणिक अब्दालीचाउपद्रव वाढत होता. 1757 सालात रघुनाथ पेशवाने दिल्लीचा ताब घेतला यात नजीबखान रोहिल्यास पकडले पण म्हल्हारराव होळकरांच्या शिष्टाईने रघुनाथरावांनी त्यास अभय दिला.  हाच अभय पुढे मराठ्यांना नडला. रघुनाथ राव दक्षिणेकडे फिरताचनजीबखान रोहील्याने अब्दालीस मदतीस बोलावले आणि अब्दालीने 1759 साली अखेर साबाजी शिंद्यांच्या ताब्यातून पंजाब घेतला त्यास रोखण्यास मराठा सरदार दत्ताजी शिंदे मदतीस आला 10 जानेवारी 1760 मध्ये दिल्लीजवळील बुराडी घाटातनजीमखान व अब्दालीने गाठले नजिमखानच्या गोळीबाराने पुढे दत्ताजी जखमी झाला.  अश्याही अवस्थेत नजिमखान व कुतुबशाह सरसावले. मरण्याच्या आगोदर नजीबने दत्ताजीस विचारते झाले  ’क्यूँ पाटील लढोगे?’ त्यावर दत्ताजीने दिलेले ’क्यूँ नही,बचेंगे तो और भी लढेंगे’  हे बाणेदार उत्तर मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा दिले. यांनी पानिपत अमर झाले. दत्ताजींचे शीर धडावेगळे करून भाल्यावर शीर खोचून नजिमखान नाचू लागला. इकडे पंजाब हातून गेल्याची व दत्ताजी पडल्याची खबरमिळताच नानासाहेब पेशवा यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उत्तरेत सैन्य पाठवले. 
तिजोरी रिकामी असतानाही उत्तरेत विशाल सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला या सैन्याचे सेनापती म्हणून सदाशिवराव भाऊ होते. त्यांच्या सोबतीला नानासाहेबांचा मोठा मुलगा विश्‍वासराव यास पाठवले.  मार्च 1760 साली उत्तरेस कूच केली.तोफखाना प्रमुख म्हणून इब्राहिम गारदी हा होता. घोडे, हत्ती, सैन्य दल तसेच, स्वयंपाकी होते. या शिवाय धार्मिक कार्य निमित्त अनेक वृद्ध, महिला, मुले व बुणगे सोबतीला निघाले. हीच युद्धातील महत्वाची अडचण ठरली. उत्तरेत गेल्यावर होळकर वशिंदे यांचे सैन्य मिळाले पावसाळ्याचे दिवस होते मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणामुळे तसेच राजपूत, जाट यांच्या भांडणांत पडल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांना विरोध वाढला  उलट त्यांनी अब्दालीस निमंत्रण दिले. ऑगस्ट 1760 पुन्हा मराठ्यांनीदिल्ली काबीज केली. पुढे पंजाब घेण्यासाठी सैन्य यमुना नदी तीरी आले याच काळात मराठ्यांना कुंजपुरा जिंकता आला पण या युद्धात मराठे गुंतलेले पाहून अब्दाली नदी पार करून अलीकडील तीरावर आला याचा परिणाम मराठयांचा दिल्ली संपर्क तुटलाआणि मिळणारी रसद बंद पडली मराठा छावणीत दुष्काळ पडला. अन्न साठा संपला. गुरांना हि चारा मिळेनासा  झाला.  काही दिवस तर हवेवर जगत होते अशी अवस्था झाली अखेर सदाशिवभाऊंनी शत्रूशी दोन हात करण्याचा  निर्णय घेतला.
पानिपतच्या युद्धाची तयारी झाली.  गोलाच्या लढाईचा नकाशा इब्राहीम गारदी आणि समशेर बहाद्दराने भाऊंच्या नजरेखाली बनवला. पश्‍चिम दिशेला मल्हारराव होळकर कमान तर होळकरांची पूर्वेची बाजू जनकोजी व महादजी शिंदे सांभाळणारहोते. मराठा सैन्याची डावी बाजू इब्राहिमखान आणि दमाजी गायकवाड ,इब्राहिमखान बरोबर विंचुरकरांची पथके साथ देणार होती.  तोफखान्याचा प्रमुख इब्राहीमखान गारदी  त्याचे दल पुढे होते. तोफखान्याच्या मागे असलेल्या घोडदळाच्या मागे 30,000अनुभवी सैनिक होते. तोफखाना शत्रुपक्षाला खिंडार पडून  दिल्लीकडे कूच करेल अशी ही योजना होती. सदाशिवराव भाऊ बरोबर विश्‍वासराव गोलाच्या मध्यभागी तर  त्यांच्या उजव्या बाजूस  यशवंतराव पवार व अंताजी माणकेश्‍वर होते.इब्राहिमखानगारदी, बंदूकधारी सैनिक, घोडदळ व  150 महाकाली व तकदीर अश्या नावाजलेल्या तोफा होत्या.  दमाजी गायकवाड,  विठ्ठलराव विंचुरकर,  त्यास मदतीला अफगाण सदाशिवरावभाऊ आणि विश्‍वासराव  13,000 घोडदळ आणि सोनजी भापकर, तुकोजीशिंदे, मानाजी पायगुडे, अंताजी माणकेश्‍वर, सुभानराव माने, संताजी वाघ, दादाजी दरेकर, सहजी झांबरे, खंडेराव नाईक-निंबाळकर, बाजी सुपेकर, ढमढेरे, काकडे, शिंदे, कडू, कामथे, मुठे, हरफळे, कदम, शितोळे, धायबर, चव्हाण असे अनेक नामवंतमराठा सरदार,सटवोजी जाधव, समशेर ,यशवंतराव पवार,जनकोजी सर्वांकडे सैन्य दल होते.  महादजी शिंदे , मल्हारराव होळकर यांच्या कडे मोठे सैन्य दल होते.  हे सर्व सैन्य 2 मैल रुंद आणि 3 मैल लांब  रचना होती   जवळपास लढाऊ सैन्य हे 50 ते 70 हजारांच्या घरात होते. सैन्य बरोबर 2 लाख बुणगे जमले होते. अब्दालीच्या  व्यूहरचनेत  मधली फळी सेनापती शाहवली पेलणार  तर उजवी फळी बरखुरदार व अमीरबेग सांभाळत होते. यांना हफिझ रहमत खान, दुंदेखान आणि बंघास खानसहाय्य करत होते.यांच्याच डाव्या हाताला रोहिले होते. तर डावी फळी नजीब सांभाळत होता. सुजा उद्दौला मध्यभागी ठेवले तर नजीबाच्या उजव्या बाजूला शहापसंद खान होता. तर फौजेच्या मागील भागात दीड कोसावर एक उंचवटा धरून अब्दाली नजरठेऊन होता. तोफांची जीमेदारी रहमान बारकझाई नजीबखान 15,हजार  पायदळ , सुजा उद्दौला कडे 3 हजार घोडदळ आणि 60 तोफा शहावली, अताईखान, गाझी  यांच्या कडे मोठी घोडदळ,शहापसंद खान बरखुरदार व अमीरबेग  घोडदळ व  पायदळ आणितोफखाना यात राखीव दल म्हणून 10 हजार घोडदळ युद्धासाठी निर्णायक ठरले. या सैन्याने 7 कोस भरेल असा चंद्रकोरीचा आकार धारण केला होता.  अब्दालीचे 90 हजार आसपास लढाऊ सैन्य होते. याही सैन्यात बुणगे होतेच. नेमके  दोन्ही बाजूनेसैन्य आकडे वारीत अनेक इतिहासकरांची वेगवेगळी मते आहेत. 
अखेर 14 जानेवारी 1761 अर्थात पौष शु. अष्टमी ला युद्धाचा आरंभ झाला. सकाळी 9 च्या सुमारास एकमेकांनी चाल केली. यात मराठ्यांच्या  वतीने इब्राहिम गारदीने ने आपली मर्दुमकी दाखवत अब्दाली च्या सैन्याला खिंडार पाडले. मराठासरदार सैन्य निकराचा हल्ला करत दुपार पर्यंत निशाण सांभाळले अखेरच्या टप्प्यात मराठ्यांच्या शिंदेच्या सैन्याने नजीबखान वर हल्ला केला. नजीब बचावात्मक पवित्रा घेत राहिला. त्यात  भाऊंनी अफगाण सैन्याला भगदाड पाडले. उजवीकडचे सैन्यजवळजवळ नष्ट झाले होते.  दुपार प्रहर त्यात, व्याकुळ झालेल्या सैन्य तरी पण विजयाचा क्षण दिसत होत्या.  त्यात विंचुरकर आणि गायकवाडांना स्फुरण चढले त्यांनी तोफखाना ओलांडून रणमैदानात प्रवेश केला इब्राहिम यास यात तोफखान बंदकरून मैदान मारावे लागले यात बंदुका बंद पडल्याने लागेल. अब्दालीचे सैन्य इनायत खानाने माघारी फिरवले हे पाहून आता अब्दालीने राखीव 10 हजार सैन्याची तुकडी घुसली.  पाहता पाहता क्षणात युद्धाचे पारडे फिरले. इकडे सकाळ पासून सदाशिवभाऊ आणि शहावली एकमेकांना भिडले. यात भाऊंनी आपली शिकस्त केली यशवंतराव पवारने अताई खानास व त्याच्या 3 हजार सैन्यास पाणी पाजले. भाऊंची दिल्लीचा मार्ग मोकळा त्यात पुन्हा राखीव सैन्याचा प्रवेशाने भाऊंचा मार्ग रोखला.  त्यातसारे सैन्य व्याकुळ झाले होते. त्यात विश्‍वासराव पडल्याची खबर भाऊंच्या कानावर पडली. नानाला काय तोंड दाखवू ? म्हणून भाऊंनी हत्तीवरून घोड्यावर स्वार  होत मैदानात भाऊ शिरले.  पाहता पाहता दुपारच्या तिच्या सुमारास भाऊंना तीनही बाजूनेघेरले. त्यात इब्राहिम गारदी पकडला गेला.  गारद्यांनी मात्र पराक्रमाची शर्थ केली. अश्या अवस्थेत भाऊ जखमी झाले आणि रणधुमाळीत बेपत्ता झाले. भाऊ अंबारीत दिसत नाही म्हणून सैन्याने कच खाल्ली. आत्ता मात्र पारडे पार फिरले होते. अनेकसरदार पडले. अनेकाकांनी काढता पाय घेतला होळकर व शिंदे यांनी आपल्या फौज माघारी फिरवल्या. रक्ताचा चिखल झाला होता. रणभूमीचा अब्दालीने निसटता विजय मिळवला  इब्राहीमखान इतर सरदारांना हाल हाल करून मारले. हजारो बाजारबुनग्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अनेक आया बहिणींची अब्रू लुटली गेली.  अनेक स्त्रियांनी विहिरींमध्ये उड्या मारून जीवन संपवले, तर काहींनी मिळेल त्या हत्यारांनी आत्म-बलिदान दिले. स्वराज्यासाठी आत्म समर्पण हा मराठ्यांचा आत्माअसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले दोन मोती गळाले , लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन, प्रेताचे ढीग, तर रक्ताचे पाट वाहत होते तर अनेक सैन्य पकडून कापले जात होते. तर कामाचा माणूस गुलाम म्हणून अफगाणस्थानाला नेले. यामुळे नानासाहेब खचले त्यात त्यांचे निर्वाण झाले. आता मराठयांना नेता उरला नव्हता पुन्हा एकदा माधवरावांच्या नेतृत्वाने व महादजी शिंदे यांनी मराठे शाही उभी केली. पानिपतचा हा रणसंग्राम मराठयांचा पराभव म्हणूनच सांगितलं जातो. मराठा सरदारांचे शौर्य पहिले तर असा जगाच्या पाठीवर न भुतो ना भविष्यती ! इतिहास मिळणार नाही. हा खरा विजय आहे. हि पराक्रमाची खरी गाथा आहे. संक्रांतीच्या दिवशी पानिपतावर मराठे अब्दाली सारख्या परकीय आक्रमकांना कापता कापता वीरगती झाले.
विठ्ठल वळसे पाटील
मो. 8484066042