Breaking News

राहुरी स्मार्ट शहर कधी होणार नागरिकांचा सवाल


राहुरी/ शहर प्रतिनिधी ः
राहुरी नगरपालिकेला 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. नगराध्यक्ष व आता मंत्रीही असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहर स्मार्ट सिटी करण्याचा शब्द दिलेला आहे तो कधी पूर्ण होणार असा सवाल राहुरीकर करत आहेत. 13 जानेवारी 1972 रोजी या नगरपालिकेची स्थापना झाली आहे.
   13 जानेवारी या पालिकेला 48 वर्षांची झाली आहे. 1972 रोजी जिल्ह्यातील पहिली क वर्ग पालिका राहुरी शहरात स्थापन झाली. त्यापूर्वी राहुरी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. शहराचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे यासाठी राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी तत्कालीन मंत्री राजाराम बापू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर राहुरी शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला होता.
गेली 30-40 वर्षे पालिकेवर तनपुरे यांची सत्ता राहिली आहे. डॉ . उषा तनपुरे यांच्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष मिळाले. आता ते आमदार आणि मंत्रीही आहेत. पालिकेचा स्थापनादिन म्हणून राहुरी पालिकेचा भोंगा वाजवून मध्यरात्री शहरात फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देण्यात आली.
सिव्हिल जज्ज कर्णिक  यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक बारवकर, तहसीलदार बी. डी. वर्पे, पहिले मुख्याधिकारी के. एन. भोंजाळ, जुन्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व पहिले नगराध्यक्ष ल. रा. तथा लालाशेठ बिहाणी, उपनगराध्यक्ष कृष्णाजी भुजाडी पाटील यांच्या साक्षीने पालिकेची स्थापना करण्यात आली होती .
त्या दिवसापासून पहाटेच्या पाच वाजता आणि रात्रीच्या साडेआठ वाजता भोंगा वाजवण्यास प्रारंभ झाला. याच ठिकाणी नवीन पालिकेची भव्य इमारत 5 जून 2011 ला अस्तित्वात आली. शहराचा विस्तार उपनगरांच्या माध्यमातून वाढला. हुतात्मा स्मारक, पाण्याची तुषार उडवणारा कारंजे , वाचनालय, अभ्यासिका, केशर मंगल कार्यालय, शाहू महाराज सांस्कृतिक कार्यालय,  राही आई हॉल, शनी मारूती मंदिर, ज्ञानेश्‍वर उद्यान,आनंद ऋषिजी उद्यान, हरणाई  उद्यान झाले आहे.
आज तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची वाटचाल सुरू आहे. नगर जिल्ह्यातील पहिल्या पालिकेला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु मंत्री व सत्ताधार्‍यांना वर्धापनदिनाचा विसर पडला आहे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. शिर्डी-शिंगणापूर या धार्मिकस्थळांना जोडणार्‍या राहुरी शहर व परिसराचा आणखी विकास आवश्यक असल्याचे दिनेश औटी शहरातील नागरिक म्हणाले.
 


प्रलंबित प्रश्‍न
नगराध्यक्ष व मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर आव्हाने कायम आहेत. सुधारित पाणी योजना, उपनगर दिवसेंदिवस वाढत आहे त्याबरोबरच समस्याही वाढत आहेत. विकासकावरील मंजुरी, घरकुल योजना, एसटी बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, शहरालगतचा बाह्यवळण रस्ता असे प्रश्‍न प्रलंबित आहेत.