Breaking News

नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या एकतेला तडे ः पवार


मुंबई ः देशभरात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकारने सत्तेचा चालवलेला दुरुपयोग  कारणीभूत असून, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडे गेल्याचे परखड मत राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतात यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या शांतता यात्रेसाठी शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.
गांधी शांतता यात्रा गुरुवारी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ पासून सुरुवात झाली असून,  अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे. सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.