Breaking News

खरडगावचे रोहित्र 10 महिन्यांपासून बंद त्वरीत दुरुस्तीचे हर्षदा काकडे यांचे निवेदन


शेवगाव/ प्रतिनिधी ः
खरडगाव येथील 10 महिन्यांपासून बंद असलेला रोहित्र त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वात नगर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांना देण्यात आले.
अधिकार्‍यांशी चर्चेदरम्यान काकडे म्हणाल्या, खरडगाव येथील रोहित्र गेल्या 10 महिन्यांपासून जळालेले आहे. या भागात खडकाळ जमीन असल्याने बागायतीचे क्षेत्र फार कमी आहे. मोजक्याच ठिकाणी विहिरीवरील विद्युतपंपांचा हंगामी वापर केला जातो.
 या वर्षी बरा पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आलेले आहे. परंतु रोहित्र जळालेला असल्याने शेतकर्‍यांनी बागायती पिके घेतलेली नाहीत. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे जर रोहित्र दुरुस्त केला तर विहिरीतील थोड्या थोड्या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी होऊ शकतो. म्हणून हे रोहित्र दुरुस्त करून मिळणे गरजेचे आहे. शेतकरी थोडे थोडे वीजबिल भरण्यास तयार आहेत, असेही काकडे म्हणाल्या.
निवेदन देताना सुनील बोडखे, जालिंदर आमटे, नानासाहेब गायकवाड, नानासाहेब लबडे, सुनील झिरपे, ज्ञानेश्‍वर बोडखे, भाऊसाहेब भोसले, महादेव बोडखे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.