Breaking News

‘ठाकरे’ सरकार 11 दिवसांत कोसळेल : नारायण राणे

मुंबई : राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल, असं भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. जेव्हा लोकसभेत सीएए कायदा मंजूर करण्यासाठी आला त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सभात्याग करून बाहेर केले. पण सुरुवातीला पाठिंबा दिला. राज्यसभेत विरोध केला. सुरुवातीला पाठिंब्यानंतर विरोध होता. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाल्यावर त्यांनी याला पाठिंबा दिला आहे. ही चांगली गोष्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. असेही ते म्हणाले. 
कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या भिवंडीमध्ये चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सरकार आज पडेल की उद्या पडेल. पण मी त्याची मर्यादा 11 दिवसांपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे 11 दिवसांत सरकार पडेल की नाही हे प्रसारमाध्यमांनी पाहावं, असे ते म्हणाले. आम्हाला असं वाटत की, कुठल्याही क्षणी हे सरकार पडू शकतं, असे हे सरकार आहे. हे सरकार कोणत्याही प्रकारे महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कोणत्याही प्रकारचं विकासकाम किंवा शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसारखा विषय सोडवू शकत नाही. आश्‍वासनं दिली आहेत. पण पूर्तता करण्याची क्षमता मुख्यमंत्री किंवा या सरकारमध्ये नाही. फक्त सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली मंडळी आहेत. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्तेवरील लोक करत आहेत. म्हणून हे भाकीत मी वर्तवले आहे. भविष्यात भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील की नाही हे मी सांगू शकत नाही. हे ज्योतिषी सांगू शकेल. त्यासाठी ज्योतिष्याकडे जावं लागेल. भविष्यात काहीही होऊ शकतं. अशी लक्षणं तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिसतात. बघू 11 दिवसांत काय होतं ते, असं वक्तव्यही नारायण राणेंनी केलं. जर उद्धव ठाकरे एकत्र आले तर तुम्ही विरोध कराल का? असे विचारले असता राणे म्हणाले, माझा विरोध नाही. जो पक्षाचा निर्णय तो माझा निर्णय असेल, असेही ते म्हणाले.