Breaking News

कोपरगाव तालुक्यात 13 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी 88 कोटी माफ होणार


कोपरगाव /तालुका प्रतिनिधी ः 
तालुक्यातील 12 हजार 790 थकीत कर्जदार शेतकर्‍यांचे 88 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. ही माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केलेली आहे. या योजनेत सप्टेंबर 2019 अखेर थकीत पीककर्ज व व्याज मिळून रुपये दोन लाखपर्यंत असेल तर कर्जमाफी होणार आहे.   
कोपरगाव तालुक्यात या योजनेची सुरुवात ही 28 फेब्रुवारीपासून होणार आहे. या दिवशी कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत. या याद्या शेतकर्‍यांना जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँक, सर्व आपले सरकार केंद्र येथे पाहावयास मिळणार आहेत.
शेतकरी बांधवांनी यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना बँकेत किंवा आपले सरकार केंद्रावर जाताना आधार कार्ड, बचत खाते ज्यामध्ये आपण घेतलेल्या कर्जाचा तपशील असेल, विशिष्ट क्रमांक जो आपणाला बँकेमधून मिळेल हे सर्व सोबत घेऊन जावे लागणार आहे.
 आधार प्रमाणीकरणासाठी आपण ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे त्या बँकेकडे किंवा आपले सरकार केंद्रस्थानी जाऊ शकतात. याबाबत कोणतीही कालमर्यादा सध्या निश्‍चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. तसेच बँकेत किंवा सेतू केंद्रांवर गर्दी करू नये. आपल्या कर्जमुक्तीचा लाभ व्यवस्थितपणे मिळावा यासाठी व्यवस्थित आधार प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. आपल्याला पोर्टलवर आपली कर्जमाफीची रक्कम दाखविण्यात येईल. ती आपल्याला मान्य असल्यास तसेच आपले आधार कार्डवरील नाव योग्य असल्यास मान्य करून आधार प्रमाणीकरण करावे. पावती घ्यावी. मान्य नसेल तर अमान्य म्हणावे. पावती घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे द्यावे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याने शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये.
 कालमर्यादा नसल्याने बँका व आपले सरकार केंद्रावर गर्दी न करता व्यवस्थित आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहनही तहसीलदार चंद्रे यांनी केले आहे.