Breaking News

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर राज्यातील 15 हजार शेतकर्‍यांचा समावेशमुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकर्‍याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचं सरकार विरोधकांना नाही, तर जनतेसाठी बांधिल आहे. मात्र, सरकार स्थिर झालं आहे. काम करत आहे यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. महाविकास आघाडीनं शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. त्याची वचनपूर्ती होत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावे आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकर्‍यांना तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचे काम सुरू झाले असून सरकारने कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकर्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी 13 व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज संपले. शेतकर्‍यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजीला सुरूवात केली. मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या 13 व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज उरकले गेले. वंदे मातरम् ने दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची सूचना दिली होती. महिला अत्याचार आणि शेतकर्‍यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला.


 शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्दयावरुन विरोधक आक्रमक
शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करु सांगितलं, अनेक अटी टाकल्या, शेतकर्‍यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम, आम्ही निषेध करतो, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. असे म्हणत त्यांनी सभागृहात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांचा सातबारा कोरा करावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकर्‍यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य करावं, या मागण्यांवरून विरोधकांनी आज विधानसभा आणि विधानसभा परिसर दणाणून सोडला. विरोधकांनी विधानसभेच्या पायर्‍यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराच्या प्रश्‍नावरही अधिवेशनात चर्चा व्हायलाच हवी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.