Breaking News

तलाठ्याला 20 हजारांची लाच घेताना पकडले लाख येथील तलाठी परशुराम सूर्यवंशीवर कारवाई


राहुरी/शहर प्रतिनिधी ः
जप्त करण्यात आलेला वाळूचा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना लाख येथील तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात हा तलाठी अडकला. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी असे या तलाठ्याचे नाव आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील एका व्यक्तीने याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना 2 ऑगस्ट 2019 रोजी पकडण्यात आले होते. ही कारवाई लाखचे तलाठी परशुराम सूर्यवंशी यांनी केली होती. हे ट्रॅक्टर राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते.
 हे ट्रॅक्टर सोडण्यासाठी तलाठी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि.14 फेब्रुवारी) 40 हजारांची मागणी केली. तडजोडीनंतर 20 हजार रुपये लाच स्वीकारण्यास तलाठी तयार झाले. तक्रारदार व्यक्ती ही रक्कम घेऊन प्रवरा नदी किनारी जातप गावच्या शिवारात आले. तलाठी येथे 20 हजार रुपये रक्कम घेण्यासाठी आले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले .
 हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी हरिश खेडकर, श्याम पवरे, दीपक करांडे, सुनील कडासने, नीलेश सोनवणे यांनी लावला होता. त्यात राहुरी तालुक्यातील लाख या सजाचा तलाठी अडकला. लाचलुचपत विभागाकडे महसूल विभागाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लाच स्वीकारतानाचे फोटोग्राफ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले आहेत.