Breaking News

शाळांना 20 टक्के अनुदान मिळणार आमदार डॉ. सुधीर तांबे यांची माहिती


संगमनेर/प्रतिनिधी ः
30 सप्टेंबर 2019मध्ये सर्व निकषांची पूर्ती करणार्‍या, अनुदानास पात्र घोषित केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
आमदार डॉ.तांबे म्हणाले, राज्यातील शाळांचा कायम शब्द वगळून त्यांना अनुदान द्यावे, या सातत्याच्या मागणीमुळे कायम शब्द वगळला गेला. 13 सप्टेंबर 2019 मध्ये नमूद निकषांची पूर्तता करणार्‍या कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या, अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मधील जादा तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवणे शक्य होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे, असे तांबे यांनी सांगितले. या निर्णयासाठी सतत केलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार तांबे यांचे  राज्यभरातील विनाअनुदानित शाळा संघटना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी अभिनंदन केले आहे.