Breaking News

राजधानीतील हिंसाचार कायम, 20 जणांचा मृत्यू इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्‍याचा मृत्यू


नवी दिल्ली ः सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, ही हिंसा चौथ्या दिवशी देखील थांबण्याची चिन्हे नाहीत. या हिंसाचारातून आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीच्या चंदबाग भागामध्ये मंगळवारी रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीत इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकार्‍याचा मृत्यू झाला. नाल्यामध्ये या अधिकार्‍याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी देखील दिल्लीतील गोकुळपुरी भागात हिंसक आंदोलनास सुरूवात झाली होती. या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका दुकानासही आग लावली. ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर बेफाम दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये सशस्त्र हिंसाचार माजवला. या परिसरात अराजकतेने थैमान घातलेले पाहायला मिळाले. हिंसाचारप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मौजपूर, चाँदबाग, जाफराबाद आणि करवालनगर या अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सुरक्षेसाठी पाचही मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्यात आले आहेत. अन्य संवेदनशील भागांमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली असून सहा हजार पोलीस, शीघ्रकृती दलाचे जवान, निमलष्करी जवान तैनात केले आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी दिल्लीचे पोलीस प्रमुख अमूल्य पटनायक त्यांच्यासोबत होते.
दरम्यान, दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला. मागच्या 72 तासात दिल्ली पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीच्या रस्त्यावर हिंसाचार सुरु आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या. केंद्राच्या बरोबरीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि प्रशासनही या परिस्थितीला जबाबदार आहेत. केंद्रातल्या सर्वोच्च नेतृत्वाचे मौन पाहून धक्का बसला असे सोनिया गांधी म्हणाल्या.