Breaking News

अवकाळीग्रस्तांसाठी सुमारे 22 कोटींचे अनुदान वर्ग श्रीगोंदेचे तहसीलदार महेंद्र माळी यांची माहिती


कोळगाव/ प्रतिनिधी : 
2019 या वर्षात अवकाळी पावसामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर 21 कोटी 82 लाख 95 हजार 827 रुपये 
वर्ग करण्यात आले आहेत. ही माहिती श्रीगोंदेचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
श्रीगोंदे तालुक्यातील पिकांची नुकसान भरपाई म्हणून 28 कोटी 15 लाख 50 हजार 387 रुपये मिळाले आहेत. त्यापैकी 21 कोटी 82 लाख 95 हजार 827 रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वर्ग झाले आहेत. सहा कोटी 32 लाख 54 हजार 560 रुपये काही तांत्रिक अडचणीमुळे वर्ग न होता  बँकांकडून परत आमच्याकडे आले. शेतकर्‍यांनी  दिलेले चुकीचे खाते क्रमांक, अपूर्ण खाते क्रमांक, बंद पडलेल्या खात्यांचे क्रमांक, चुकीचे बँक आयएफएससी कोड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपले खाते क्रमांक 15 अंकी करताना सुरुवातीला लावलेले शून्य एक्सेलच्या रकान्याने स्वीकारले नाहीत. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या खात्यावर एकही पैसा जमा होऊ शकला नाही, असे तहसीलदार माळी यांनी सांगितले.
विविध तांत्रिक अडचणीमुळे बँकांकडे वर्ग केलेल्या रकमा परत आमच्या खात्यावर येत होत्या. शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान जमा करताना आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून ती रक्कम पुन्हा संबधित बँकांकडे पाठविलेली आहे. ती आता जमा होण्यास काहीही अडचण येणार नाही, असेही माळी म्हणाले. राज्यातील 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यामधील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान भरून काढण्यासाठी रक्कम देण्यात येणार होती. पिकांसाठी हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय  सरकारने घेतला होता. त्यासाठी सहा हजार 559 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.