Breaking News

युवकाचा मृतदेह 25 तासांनंतर पाण्याबाहेर मासेमारी करताना बुडाला होता मुळा धरणात


राहुरी/ शहर प्रतिनिधी ः
मुळा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह 25 तासांनंतर पाण्याबाहेर काढण्यात आला.
नानासाहेब रघुनाथ जाधव (वय 35, रा. ठाकरवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी (दि. 22) सकाळी 10च्या सुमारास तो मुळा धरणात पडला होता.
चिंचाळे येथे मुळा धरणाच्या बॅकवॉटर जवळ मासेमारी करण्यासाठी शनिवारी नानासाहेब गेला होता. सकाळी 10 वाजता मुळा धरणाच्या जलाशयात तो मासेमारीचे जाळे टाकत होता. याचवेळी त्याला चक्कर येऊन तो पाण्यात पडला होता.
नानासाहेब याचा रोज सायंकाळी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी जाळे पसरण्याचा नित्यनियम होता. सकाळी पुन्हा जाळे काढण्यासाठी जायचे व परत नऊ ते साडेनऊ पर्यंत परत यायचे. असा त्याचा नियम असायचा. पण शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत परत न आल्याने त्याचे वडील रघुनाथ जाधव व भाऊ मासेमारी करण्याच्या ठिकाणी गेले. त्यांना नानासाहेब जाधव यांचे कपडे व चप्पल दिसली. नानासाहेब कुठेच दिसत नसल्याने मासेमारी करणार्‍या भीमा जाधव, किरण जाधव, रावसाहेब जाधव, पाराजी जाधव यांच्या मदतीने होडीतूनही नानसाहेब याचा शोध घेण्यात आला. परंतु तो आढळला नाही. हे शोधकार्य रात्र होईपर्यंत सुरु होते. शोध घेणे अशक्य झाल्यानंतर रात्री ही शोध मोहिम थांबवण्यात आली होती.
 मदत कार्यासाठी रविवारी सकाळी नगर महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. बारागाव नांदूर परिसरातील पोहणारे बाळासाहेब बर्डे, पोलिस पाटील शिवाजी केदारे, बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब वडीतके, घमाजी जाधव, प्रभाकर गाडे यांनीही शोधकार्यासाठी मदत केली. यावेळी नानासाहेब याचा मृतदेह आढळून आला.
   राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुरी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली.