Breaking News

कोरेगाव भीमाचे 348 तर, मराठा आंदोलनाचे 460 गुन्हे मागे गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती


 मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणांतील आंदोलकांवर असलेले तब्बल 348 गुन्हे आणि मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली. तसेच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देखील देशमुख यांनी यावेळी दिले आहे. तसेच आपल्याविरोधीतील बाजू असणार्‍यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मराठा आंदोलनातीलही 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणातील उरलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. हे गुन्हे किरकोळ स्वरुपाचे आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचं करण्यात आलेलं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र आज विधान परिषदेत उत्तर देताना देशमुख यांननी नाणार आंदोलनातील केवळ तीनच गुन्हे मागे घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं. शेतकरी आंदोलनातील गुन्हेही मागे घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी देशमुख यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरून तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला टोले लगावले. कोरेगाव-भीमा प्रकरणाची चुकीच्या दिशेने चौकशी झाली असेल तर पोलीस अ‍ॅक्ट किंवा एनआयए सेक्शन 10नुसार याप्रकरणाची महाराष्ट्र सरकार चौकशी करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.