Breaking News

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा 36 वर हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश


नवी दिल्ली ः गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि जाळपोळ काही प्रमाणात थांबली असून, ईशान्य दिल्लीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतांना दिसून येत आहे. मात्र या हिसांचारामुळे 36 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषणं करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करावेत किंवा नाहीत यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, दिल्लीत तीन दिवस हिंसाचार सुरु होता याकडे केंद्र सरकार डोळेझाक केली.  दरम्यान, ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्यामध्ये आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. कारण त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. यापूर्वी याच घराचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये या घरावरुन सातत्याने दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते. गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबाने या घरावर असलेल्या लोकांनाच जबाबदार धरले आहे. मात्र, आपचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आता ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली असून याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आता दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी या घरावर गेले तेव्हा त्यांना तिथे या सर्व गोष्टी आढळून आल्या. यामध्ये दगड आणि काही दगडांचा भुगाही होता. जसे विटा फोडून त्याचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तेथे एक मोठी गुलोलही पडलेली होती. पेट्रोल भरुन त्यावर कपडा लावलेल्या कोल्डड्रिंकच्या बाटल्याही इथे आढळून आल्या आहेत. याचा वापर बॉम्बसारखा वापर करण्यात येत होता. त्याचबरोबर काही गावठी कट्टे आणि पोतेही मिळाले आहेत. ज्यामध्ये काही दगड आढळून आले आहेत. याप्रकरणी ताहिर यांनी आजवर स्वतःला निर्दोष म्हटले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हिंसाचारावेळी ते घरामध्ये उपस्थित नव्हते. पोलिसांनी त्यांना सुरुवातीलाच तिथून बाहेर काढलं होतं. त्यांनी म्हटलं, माझ्या घरावरुन कोण बॉम्ब फेकत होते याची मला माहिती नाही. समोरच्या घऱावरुन आपल्या घराच्या दिशेने बॉम्ब फेकण्यात येत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.