Breaking News

भारत उपांत्य फेरीत दाखल, न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय सामनावीर शफाली वर्माची धडाकेबाज 46 धावांची खेळी


मेलबोर्न : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून भारतीय संघ महिलांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. शफालीची (46) धडाकेबाज खेळी आणि तिला तानियाने (23) दिलेली साथ याच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 134 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न 3 धावांनी तोकडे पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
हरमनप्रीत कौरच्या संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. पहिल्या दोन सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलिया व बांगलादेशच्या महिलांना मात दिली. सलग दुसर्‍या सामन्यात 16 वर्षांची शेफाली वर्मा प्लेयर आफ दी मॅच ठरली. तिने सलामीला खेळताना 34 चेंडूतच 46 धावांची आकर्षक खेळी केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यावर भारताला 8 बाद 133 धावात रोखून चांगली कामगिरी बजावली होती पण भारतीय गोलंदाजांनी या धावासुध्दा पुरेशा ठरवल्या. शिखा पांडेने चार षटकात फक्त 21 तर राजेश्‍वरी गायकवाडने चार षटकात फक्त 22 धावा दिल्या. दोघींनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पूनम यादवने धोकादायक ठारु शकणारी न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हिन हिला 14 धावांवरच बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यामुळे शेवटी न्यूझीलंडचा संघर्ष 6 बाद 129 असा अपूरा पडला. 19 चेंडूत नाबाद 34 धावा करणार्‍या अमेलिया केरचे प्रयत्न अपूरे पडले. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी पाच धावांची गरज होती पण शिखा पांडेने प्रभावी यॉर्कर टाकून संधी दिली नाही. या विजयानंतर सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली शेफाली म्हणाली की, पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात देण्याचा माझा प्रयत्न सफल झाला. कमजोर चेंडूंना फटकारण्याचे तंत्र यशस्वी झाले. मी आज येथवर पोहोचलीय याचे श्रेय माझ्या वडिलांना आहे. प्रशिक्षक आणि अकादमीत माझ्यासोबत सराव करणार्‍या मुलांनाही मी धन्यवाद देते. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला 16 धावांची गरज होती. त्यात अमेलिया व हेली जेन्सन यांनी प्रत्येकी एक चौकार लगावून पहिल्या पाच चेंडूत 11 धावा वसूल केल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर अमेलिया केरने चौकार लगावला असता तर सुपर औव्हरची वेळ आली असती पण शिखा पाडेच्या यार्करने ती वेळ येऊ दिली नाही. 19व्या षटकात न्यूझीलंडने 18 धावा वसूल करत सामन्यात रंगत आणली होती. त्याआधी भारताचा डाव 9 षटकात 1 बाद 68 अशा चांगल्या सुरुवातीनंतर शेवटच्या 11 षटकात 55 धावांमध्ये 7 फलंदाज गमावून गडबडला. अखेरच्या षटकात 12 धावा निघाल्या त्या महत्त्वाच्या ठरल्या. भारताने या सामन्यात अरुंधती रेड्डी व रिचा घोषला विश्रांती देत स्मृती मानधना व राधा यादव यांना खेळवले.