Breaking News

राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक


नवी दिल्ली : 17 राज्यांमधील राज्यसभेच्या 55 सदस्यांच्या जागा भरण्यासाठी 26 मार्च रोजी द्विवार्षिक निवडणुका होणार आहे. राज्यसभेच्या या जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपतो आहे. या 17 राज्यांमध्ये महाराष्ट्र (7), ओडिशा (4), तामिळनाडू (6), पश्‍चिम बंगाल (5), आंध्र प्रदेश (4), तेलंगणा (2), आसाम (3), बिहार (5), छत्तीसगड (2), गुजरात (4), हरयाणा (2), हिमाचल प्रदेश (1), झारखंड (2), मध्य प्रदेश (3), मणिपूर (1), राजस्थान (3) आणि मेघालय (1) जागा आहेत. राज्यसभेतील 68 जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस काही जागा गमावणार असल्याने सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे. रिकाम्या होणार्‍या 19 पैकी सुमारे 9 जागा काँग्रेस गमावू शकते. प्रियंका गांधी वढेरा, ज्योतिरादित्य शिंदे आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह काही बडया नेत्यांना वरिष्ठ सभागृहात आणण्याचा काँग्रेस विचार करत असल्याची चर्चा आहे. स्वबळावर 9 आणि मित्रपक्षांच्या मदतीने एखादीदुसरी जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्‍वास आहे. काँग्रेस सत्तेवर आहे त्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पक्षाच्या जागा काही प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे. यावर्षी एप्रिल, जून व नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकांनंतर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील 51 जागा यावर्षी एप्रिलमध्ये, आणखी 5 जागा जूनमध्ये, तर 11 जागा नोव्हेंबरमध्ये रिकाम्या होणार आहेत.