Breaking News

तब्बल 72 कोटींचा बँक घोटाळाप्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक


पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. बँकेच्या दफ्तरामध्ये बनावट नोंदी करून आणि त्या खर्‍या असल्याचे भासवून तब्बल 71 कोटी 78 लाखांचे व्यवहार लपवून रकमेचा अपहार केल्याचा आरोप आमदार भोसले आणि अन्य आरोपींवर आहेत. या प्रकरणी भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.
बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह बँक अधिकारी सूर्याजी जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघांना अटक केली. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या एकूण 14 शाखा असून, एकूण 16 हजार खातेदार आहेत. आरबीआयने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या ऑडिटमध्ये 71 कोटी 78 लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले होते. हा प्रकार 23 मे 2019 पूर्वी घडलेला आहे. याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसले दांपत्यासह 16 जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.