Breaking News

शिक्षकांनी सर केले कळसूबाई शिखर सह्याद्री ट्रेकर्सचा उपक्रम


अहमदनगर / प्रतिनिधी
समुद्र सपाटीपासून हजार ६४६ मीटर उंचीवर असलेले कळसूबाईचे शिखर चढाईच्या दृष्टीने मध्यम अवघड श्रेणीत मोडते. येथील मनमोहक सूर्योदय पाहण्यासाठी अनेक पर्यटक कळसूबाई शिखराची वाट धरतात. महाराष्ट्राचे सर्वोच्य शिखर अशी बिरुदावली मिरवणारे कळसूबाई शिखर नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी सर केले. सह्याद्री ट्रेकर्सतर्फे या कळसूबाई नाईट ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मात्र निसर्गाचा रुद्र अवतार ट्रेकर्सना पहायला मिळाला. गोठणबिंदूशी स्पर्धा करणारे निचांकी तपामान, तोंडावर बर्फाच्या लहान-लहान कणांचा होणार जोरदार मारा, हातातील फोन उडवून लावण्याची ताकद बाळगणारा सोसाट्याचा वारा असा निसर्गविष्कार या ट्रेकर्संना अनुभवयास मिळाला. अशा प्रतिकूल वातावरणातही सर्वांनी जिद्दीने शिखर गाठले. पहाटे साडेचार वाजता शिखर चढाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली. इयत्ता पाचवीत शिकणारा अभिजित थोरात आणि वयाची पन्नाशी गाठणारे यशवंत गवळी यांच्यासह ३१ शिलेदारांनी या ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. कळसूबाई शिखरापर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: साडेतीन तास लागतात. या ग्रुपमधील नाना गाढवे, राम तुपे, प्रकाश मुरकुटे यांनी हे शिखर फक्त एक तास १२ मिनिटांत सर केले. यावेळी सामाजिक जबाबदारी जपत कळसूबाई शिखर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्या, बॉटल जमा करुन शिक्षकांनी स्वच्छता मोहिमदेखील राबविली. या स्त्युत्य उपक्रमाचे नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती हेमलता गलांडे यांच्यासह अनेकांनी कौतूक करुन अभिनंदन केले.