Breaking News

नाणार प्रकल्पाचं नवं राजकारण!

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठल्या ना कुठल्या विषयावरुन तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुर ऐकायला मिळत आहे. कधी सावकरांचा विषयावरुन, कधी सीएए, एनआरसीच्या विषयावरुन तर कधी प्रकल्पांच्या मान्यता रद्द करण्याच्या विषयावरुन वादंग होताना दिसतं. आताही नाणार प्रकल्पावरुन आघाडी सरकारमध्ये तू-तू-मै-मै सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाने सरकार पडणार नाही याची खबरदारी घेतली जात नसेल तर नवलच म्हणावे लागेल. एखाद्या विषयावरुन वादावादी झाली तरी तुटण्यापर्यंत कुणीही ताणायचं नाही, याची काळजी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते घेताहेत ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. असं असलं तरी महाविकास आघाडीत केव्हा बिघाडी होईल, हे आजतरी कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. दुसरीकडे हे सरकार पडावं यासाठी भाजपची मंडळी पाण्यात देव घालून बसलीय, हे राज्यातील जनतेला कुणी सांगण्याची गरज नाही. हे सरकार आठ दिवसात पडेल, कुणी म्हणतंय 15 दिवसांत पडेल, अशा प्रकारच्या वल्गना भाजपची मंडळी सातत्याने करीत आहेत. त्यात त्यांना यश येण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नसली तरी महाविकास आघाडीला त्यांच्यापासून असलेला धोका कुणीही नाकारणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पावरून आता आघाडीत सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. याचं कारण रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसने नाणार प्रकल्पावरुन नव्या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.  हा विषय चिघळला तर महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास नक्कीच अधिक वेळ लागणार नाही. शिवसेनेचा नाणारला विरोध कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या पहिल्या दौर्‍यात सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत विरोधाबाबतची  आपली भूमिका स्पष्ट केली होती.  त्यामुळे नाणार प्रकल्पाच्या बाबतीत शिवसेना बॅकफूटवर येणार नाही, हे सुध्दा तेव्हाच स्पष्ट झालं होतं.  
परंतु,  पण, आता रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत नाणार आणि आयलॉगसारखे प्रकल्प झाले पाहिजेत, अशी वेगळी भूमिका घेतली आहे. कोकणातल्या रोजगार निर्मितीसाठी नाणार, आयलॉगसारखे प्रकल्प  झालेच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक निलिंद किर आणि माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस कुमार शेटे हजर होते. प्रकल्पांबाबत ‘आम्हाला विचारल्याशिवाय पक्षश्रेष्ठींनी भूमिका ठरवू नये’ असं विधान कुमार शेटे यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय? असा सवाल देखील विचारला जात आहे. ज्या राजापूर तालुक्यात हे दोन्ही प्रकल्प येणार आहेत त्याठिकाणचा एकही नेता अथवा पदाधिकारी या बैठकीला हजर नव्हते. शिवाय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबजी जाधव यांना देखील याबाबतची कल्पना नव्हती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव, गटातटाचं राजकारण का नाणारबाबत नवं राजकारण केलं जात आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर ’प्रकल्प रायगडमध्ये जावेत यासाठी सुपारी घेतली काय?’ अशा शब्दात टीका केली. शिवाय, सिंधुदुर्गचे पालकमंत्री असताना आणि रत्नागिरीचे आमदार असताना नाणार प्रकल्पात सामंत लुडबुड करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. दरम्यान, मी मुंबईला होतो. मला या पत्रकार परिषदेबाबत काहीही माहिती नाही. पण, स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका आहे. पक्षाचे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी घेतल्याचे समजत आहे. त्यामुळे रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित करुन राष्ट्रवादीच्याच वर्तुळात सर्वाधिक चर्चा होताना ऐकायला मिळत आहे. नाणार प्रकल्पावरून नवं राजकारण करण्यासाठी तर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नव्हती ना? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 
आम्हाला प्रदुषणविरहीत प्रकल्प हवेत अशी मागणी देखील दुसर्‍या बाजुला रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते करताना दिसत आहेत. परिणामी, त्यांना नेमकं काय हवं आहे, हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरित राहिला आहे. नाणार प्रकल्पाकरिता आता समर्थक एकवटले आहेत. यावेळी समर्थकांकडून आमच्याकडे 8 हजार एकर जमीन मालकांची परवानगी असल्याचा दावा केला जात आहे. त्याकरिता जमीन मालकांचं अ‍ॅफिडेव्हीट  दाखवलं जात आहे. पण, कोकणातल्या सातबाराची परिस्थिती आणि त्यावर असलेली नावं पाहता, खरंच 8 हजार एकर जमीन मालक परवानगी द्यायला तयार आहेत का? शिवाय, घरातील अथवा सातबारावरील एका जमीन मालकानं दिलेल्या परवानगीचा अर्थ सर्वांची परवानगी असा होतो का? हाही प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहतो. आता नाणार रिफायनरी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण सुरू झालं आहे का? असा सवाल देखील केला जात आहे. कारण, रत्नागिरी रिफायनरी नाही तर, छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरीचे मी जमीन मालक स्वागत करतो, असे फलक समर्थकांनी झळकवले आहेत. त्यामुळे भावनिक मुद्याला हात घालण्याचं आणि महाराजांच्या नावाचा उल्लेख नेमका कशासाठी? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेवर सध्या जोरदार टीका होताना दिसतेय. काही स्थानिक शिवसेना नेते आणि पदाधिकारी हे सुध्दा प्रकल्पाचे जोरदार समर्थन करताना दिसत आहेत. त्यावरून सध्या सेनेतच दोन गट दिसू लागले आहेत. त्यामुळे आता नाणार आणि आयलॉगसारख्या प्रकल्पांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाणार येथे 1 मार्च रोजी शिवसेना जाहीर सभा घेणार आहे. या सभेला खासदार, आमदार, जिल्हासंपर्क प्रमुख, तालुकाप्रमुखांसह इतर नेते हजर राहणार आहेत. एकंदरित नाणार प्रकल्पावरुन शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. नाणार प्रकल्पाचा हा नवा वाद आघाडीच्या मूळावर येण्यापुर्वीच पक्षश्रेष्ठींनी यावर मंथन करुन योग्य तो निर्णय घ्यावा. यासाठी आपापल्या पक्षातील कोकणातील नेत्यांचाही विचार घेवूनच मार्ग काढणे महाविकास आघाडीसाठी फायद्याचे ठरेल.