Breaking News

एसआरपीच्या 'त्या' कर्मचाऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू मात्र पत्नीने व्यक्त केला घातपाताचा संशय


अहमदनगर / प्रतिनिधी
नगर-कल्याण रोडवरील शंकर महाराज मठात राज्य राखीव पोलीस दलातील प्रमोद बबन राऊत या कर्मचाऱ्याचा मृत्यू सर्पदंशाने झाला असल्याचे डॉक्टरच्या अहवालानुसार स्पष्ट झाले असल्याचे तोफखाना पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेत त्यांच्या पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला नसून घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक मिटके यांना प्रिया राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की माझे पती प्रमोद राऊत यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे. याप्रकरणी सदर मठातील बाबांसह सेवेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. पती प्रमोद हे दि. रोजी नगर -कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात असलेल्या मठात मयत झाले आहेत. मात्र हा घातपात असून नरबळी असावा. केडगाव येथील एका व्यक्तीने पतीला ताबडतोब त्या मठात बोलविले. ते कोणाला काही सांगता बाबाला भेटायला  गेले. तेथे पती आणि त्यांच्यात वाद झाले. या वादासंदर्भात पतीने कल्पना दिली होती. हे लोक त्यांना मठातून बाहेर पडू देत नाही, असेही त्यांनी संगितल्याचे प्रिया राऊत यांनी या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित सेवेकऱ्यांना विचारले असता ज्या कारणामुळे पतीचा मृत्यू झाला ते कारण टाकले असता तुम्हाला पतीच्या मृत्यूनंतर चांगली रक्कम मिळाली नसती. त्यामुळे त्यांचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याची कागदपत्र आम्ही तयार केली आहेत. त्यांच्या या बोलण्याने आमचा संशय बळावला. माझ्या पतीला तेथे मारहाण झाली असून तशी छायाचित्रदेखील उपलब्ध आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालात मारहाणीच्या खुणा दाखविण्यात आल्या नाहीत. आमचे नातेवाईक महाराजाकडे चौकशी करायला गेले असता ते मारायला धावून आले. सदर इसम गुंडप्रवृत्तीचा असून माझ्यामागे कोणतेही पाठबळ नाही. शंकर महाराजांच्या नावाला काळिमा फासून सदर भोंदू इसम आणि त्याचे सेवेकरी यांनी माझ्या पतीचा षडयंत्र रचून खून केला असल्याचे संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी  मागणी प्रिया राऊत यांनी केली आहे.