Breaking News

पाच नंबर साठवण तलावासाठी निधी द्यावा आमदार काळे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


कोपरगाव/प्रतिनिधी ः
कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या साठवण तलावांची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली.
        जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामविकास आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्‍नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या कामाबाबतही चर्चा केली.पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यावेळी उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले की, गावठाण हद्द वाढीचे प्रस्ताव तातडीने तयार करणे आवश्यक आहे. अतिक्रमण करून गावठाण हद्दीत राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित करावीत. मागील पाच वर्षात कोपरगाव मतदारसंघाच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला गौण खनिज निधीअंतर्गत एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्याला गौण खनिज निधी मिळावा. वन विभागाने हरिण, काळवीट, रानगायी आदींमुळे शेतकर्‍यांचे होत असलेले नुकसान थांबवण्यासाठी या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा. जंगली जनावरांमुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना वनविभागाकडून तातडीने भरपाई द्यावी. वनविभागाच्या रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांचा पगार वेळेवर मिळावा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखला जावा, अशीही मागणी त्यांनी केली.
पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, विमल आगवण, सोनाली साबळे, माजी सभापती अनुसया होन, मधुकर टेके, श्रावण आसने यावेळी उपस्थित होते.