Breaking News

दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश एकत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही


अहमदाबाद ः  प्रत्येक देशाला आपल्या सिमाचे संरक्षण कऱण्याचा हक्क आहे. असे सांगत  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने पाकिस्तानकडून होणार्‍या दहशवादी कारवायांविरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवला.  दोन दिवसाच्या भारत दौर्‍यावर आलेल्या ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणात पाकिस्तानचे कान टोचले. दहशतवादापासून सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोन्ही मिळून एकत्र काम करू. आम्ही पाकिस्तानसोबत मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु ठेऊ, असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करेल. भारत पाकिस्तान सिमेवरील दहशतवादी तळ संपवण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबर काम करत आहोत. आमचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारत असले तरी त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी आपली जमीन वापरु देऊ नये, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधरला आहे. पाकिस्तानने त्यांच्या जमीनीवरुन होणार्‍या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेत ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशावर थेट निशाणा साधला. कट्टर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असा विश्‍वास व्यक्त करताना ट्रम्प यांनी आयसिसचा उल्लेख केला. आम्ही आयसिसचा 101 टक्के खात्मा केला आहे. भविष्यातही इस्लामिक दहशतवादाविरुद्ध दोन्ही देश लढत राहतील, असा माझा विश्‍वास आहे, असंही ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले. भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसोंदिवस दृढ होत असल्याचे मत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. याआधी दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती, असं ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.


 भारत-अमेरिकेच्या नात्याचे नवे युग सुरु ः पंतप्रधान मोदी
नमस्ते ट्रम्प, नमस्ते ट्रम्प, नमस्ते ट्रम्प असा त्रिवार उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटेरा स्टेडिअमवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोठा विचार करतात. त्यामुळेच ते अमेरिकेचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहेत. ट्रम्प प्रशासनात भारत आणि अमेरिकेच्या नव्या नात्याचे युग सुरु झाले आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दीर्घ प्रवासानंतर ट्रम्प हे थेट साबरमती आश्रमात आले आणि पुन्हा येथे मोटेरा स्टेडिअमवर. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. भारत-अमेरिकेतील नव्या नात्याच्या युगास सुरुवात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपल्या विविधतेने पूर्ण असलेल्या भारतात आले आहेत. जिथे शेकडो भाषा बोलल्या जातात. शेकडो प्रकारचे वस्त्रे आहेत, शेकडो प्रकारच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती आहेत. अनेक पंथ आणि समुदाय आहेत. विविधेत एकता भारत आणि अमेरिकेदरम्यान मजबूत नात्याचा मोठा आधार आहे.  एक लँड ऑफ दी फ्री आहे. तर दुसरे संपूर्ण जगाला एक परिवार मानतात. एकाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर गर्व आहे. तर दुसर्‍याला जगातील सर्वांत उंच सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा अभिमान असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 
मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती :  ट्रम्प

’मोदी माझे खरे मित्र आहेत. ते भारताचे यशस्वी पंतप्रधान आहेत. देशाच्या विकसासाठी ते झटत आहेत. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती होत आहे, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेले डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी मोदींसह भारताचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ’पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकत होते. त्यांनी हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम करुन काहीही साध्य करता येते. भारत खूप चांगले काम करत आहे. आम्हाला भारताचा अभिमान आहे. तसंच, ’ मोदींच्या काळात प्रत्येक गावात वीज पोहचली. प्रत्येक गावं इंटरनेटशी जोडली गेली. जनतेला मोदींविषयी खूप प्रेम आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताची अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसंच त्यांनी भारतामध्ये भव्य स्वागत केल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत.