Breaking News

राज्यभरात मराठी भाषेचा जागर मराठीचे वाकडे करण्याची कुणाचीही हिंमत नाही ः मुख्यमंत्री


मुंबई ः राज्यात गुरुवारी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांनी मराठी भाषेचा जागर करण्यात आल्याचे पहायला मिळाले. भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेने मराठी भाषा दिन साजरा करू नका, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
विधानभवनात ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकंट आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमाणावेळीही मराठी धावून गेली होती?, असे ठाकरे यावेळी म्हणाले. मराठीचे वाकडे करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी बाबत बोलताना त्यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती, असंही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे. माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की मराठी भाषा ही र्‍हस्व दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे, असंही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना सांगितलं. राज्यातील शाळांची नावं मराठीत का नाही असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. जुन्याची गरज आजही आपल्याला आहे, असं सांगताना त्यांनी घारतील लाईट आणि दिव्याचं उदाहरण दिलं. पूर्वी वासुदेव यायचे. आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. परंतु नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहित नाहीत. ऐकतो मराठी, बोलतो मराठी तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.